जळगाव - जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत नसल्याची चिन्हे आहेत. गुरुवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल 135 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2020 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कमी संख्येने आढळून येत असल्याने काहीसा दिलासा होता. मात्र, गुरुवारी पुन्हा सव्वाशेहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा प्रशासनाला गुरूवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये सर्वाधिक 23 रुग्ण हे चोपडा याठिकाणचे आहेत. त्यापाठोपाठ 21 रुग्ण जळगाव शहरात आढळून आले आहेत. जळगाव शहरातील रुग्ण संख्येचा वेग कमी होत नसल्याने भीती कायम आहे. भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर तसेच पारोळा या ठिकाणीदेखील सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर 21, जळगाव ग्रामीण 5, भुसावळ 11, अमळनेर 16, चोपडा 23, पाचोरा 3, भडगाव 1, धरणगाव 8, यावल 6, एरंडोल 8, जामनेर 12, रावेर 8 आणि पारोळा येथील 13 रुग्णांचा समावेश आहे. चाळीसगाव, मुक्ताईनगर आणि बोदवडमध्ये एकही नवा पॉझिटिव्ह रुग्ण गुरुवारी आढळून आलेला नाही.
तिघांचे अहवाल मृत्यूनंतर आले पॉझिटिव्ह -
जिल्हा प्रशासनाला गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जिल्ह्यातील तीन संशयित रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल त्यांंच्या मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पारोळा येथील 87 वर्षीय वृद्ध, जळगावातील 55 वर्षीय महिला आणि जामनेर तालुक्यातील 70 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. या तिघांचा कोविड रुग्णालयात 17 जूनला उपचार सुरू असताना मृत्यू झाला.सोबतच धरणगाव येथील 55 वर्षीय पॉझिटिव्ह महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. तिला 16 जूनला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 155 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
1 हजार 181 जणांची कोरोनावर मात -
जिल्ह्यातील 1 हजार 181 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारीदेखील 127 जणांना घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत 684 जणांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 43 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोरोना अपडेट( आतापर्यंतची रुग्ण संख्या ) -
जळगाव शहर - 367
जळगाव ग्रामीण - 68
भुसावळ - 338
अमळनेर - 252
चोपडा - 164
पाचोरा - 49
भडगाव - 96
धरणगाव - 99
यावल - 106
एरंडोल - 64
जामनेर - 99
रावेर -150
पारोळा - 114
चाळीसगाव - 19
मुक्ताईनगर - 15
बोदवड - 14
इतर जिल्हे - 6
एकूण रुग्ण - 2020