जळगाव - भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसचे सरकार आले. काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटविण्याचा विश्वास दिला होता. पण काँग्रेसच्या काळात केवळ मुठभर नेते आणि त्यांच्या चेल्या-चपाट्यांचीच गरिबी दूर झाल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज भुसावळात केली.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी रशियाचे सोशल कम्युनिस्ट मॉडेल आपल्या देशाच्या विकासाकरता वापरून देशाची गरिबी हटविण्याचा विश्वास दिला होता. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, त्यांनीही गरिबी हटाव हाच नारा दिला. नंतर राजीव गांधी आले. सोनिया गांधी आल्यावर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यांनीही गरिबी हटाव हाच नारा दिला. आता पंडितजींचे पणतू देखील गरिबी हटाव हाच नारा देत आहेत. असे म्हणत नाव न घेता त्यांनी राहुल गांधीवर टीका केली.
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री एकनाथ खडसे, आमदार चैनसुख संचेती, हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, उमेदवार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.