जळगाव- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेविरोधात विरोधकांनी रान पेटविण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जळगावात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेविरुद्ध थाळीनाद मोर्चा काढला. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या मोर्चाचे नेतृत्त्व केले.
शहरातील आकाशवाणी चौकात असलेल्या पक्ष कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. आकाशवाणी चौकात घोषणाबाजी केल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
एकीकडे राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, युवक-युवती, गृहिणी अशा सर्वच घटकांचे असंख्य प्रश्न अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्ताने राज्यभर फिरत आहेत. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना यात्रा महत्त्वाची आहे. २५ दिवस ही यात्रा सुरू असणार आहे. इतके दिवस मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सरकार चालवणार कोण? या यात्रेचा खर्च कोण करणार? या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजेत. आता आम्ही राज्यभरात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेतच त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तरे विचारणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी यावेळी सांगितले.
सरकारविरोधात घोषणाबाजी-
या मोर्चावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चात सहभागी झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी थाळीनाद करत आपला निषेध नोंदवला.