जळगाव - सोबत दारू पीत असताना झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास जळगाव शहरातील इंद्रप्रस्थनगर परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण हरी पवार (वय 45, रा. के. सी. पार्क परिसर, कानळदा रस्ता, जळगाव) असे मृताचे नाव आहे. तर, सचिन ऊर्फ काल्या मंगल अटवाल (वय 32) असे मित्राचा खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मयत अरुण, संशयित आरोपी सचिन अटवाल हे काही मित्रांसह इंद्रप्रस्थनगर परिसरात दारू पित बसलेले होते. काही वेळानंतर त्यांच्याकडे असलेली दारू संपली. त्यामुळे पुन्हा दारू विकत आणावी, असे काही मित्र सांगत होते. त्यावेळी सचिन याने अरुण यांच्याकडे दारू आणण्यासाठी त्याची दुचाकी मागितली. पण अरुणने दुचाकी देण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग आल्याने सचिनने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
दोघेही दारूच्या नशेत असल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढून हाणामारी झाली. त्यावेळी इतर मित्रांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. हाणामारीत सचिनने अरुणच्या डोक्यात फरशी घातली. त्यामुळे गंभीर दुखापत होऊन अरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. नंतर सचिन याच्यासह इतर मित्रांनी जखमी अरुणला शिरसोली रस्त्यावरील देवकर महाविद्यालयातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण डोक्यातून अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अरुण याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर काही प्रत्यक्षदर्शी मित्रांचे जाबजबाब नोंदवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मयत अरुण यांच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अरुण यांची पत्नी रत्नबाई अरुण पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन अटवाल याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर संशयित आरोपी सचिन हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला शहर पोलिसांनी अटक केली.