जळगाव - सन 2014मध्ये भाजपचे एकट्याच्या बळावर सरकार आल्यानंतर मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो. मात्र, मला बाजूला करण्यासाठी माझ्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात आले. मला नाहक बदनाम करण्यात आले. माझ्याविरुद्ध एकही आरोप सिद्ध झालेला नाही. तरीही पक्षाने माझा गुन्हा काय आहे, ते स्पष्ट केलेले नाही. मी दोषी असेन तर, मला निश्चितच शिक्षा दिली पाहिजे. पण मी गुन्हा केलेला नसेन तर, माझ्यावर अन्याय का? हा माझा पक्षाला सवाल आहे. पक्षातील काही ठराविक नेत्यांनी माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केली आहे, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्यक्ष नाव न घेता हल्ला चढवला आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत 'नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान' नावाचे पुस्तक आपण लिहिणार असल्याचे सांगत खडसेंनी पुन्हा एकदा पक्षविरोधी भूमिका घेतली आहे.
मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी शनिवारी भाजपचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजप सरकारमधील तत्कालीन मंत्र्यांबाबत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. यावेळी खडसे यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असल्यानेच आपल्यावर अन्याय झाला आहे. सन 2009 ते 2014 या काळात राज्यात भाजपचे सरकार यावे, यासाठी माझ्यासह गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर, गिरीश बापट, विनोद तावडे यांनी जिद्दीने सामूहिक प्रयत्न केले. त्यामुळे सरकारविरोधात वातावरण निर्मिती होऊन भाजपचे स्वबळावर सरकार आले. साधारण अपेक्षा अशी असते की, जो विरोधी पक्षनेता असतो तोच पुढे जाऊन मुख्यमंत्री होतो. मात्र, त्यावेळी दुर्दैवाने मला मुख्यमंत्रीपद न मिळता फडणवीसांना मिळाले. नंतरच्या काळात मुख्यमंत्रीपदाचा मी दावेदार आहे, हे लक्षात आल्यानंतर एक षडयंत्र रचले गेले. माझ्या 40 वर्षांच्या राजकीय काळात माझ्यावर एकही आरोप झालेला नसताना सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच माझ्यावर एकामागे एक आरोप करण्यात आले. हा त्या षडयंत्राचाच भाग होता, असा दावा त्यांनी केला.
माझ्यावर आरोप करणाऱ्या भंगाळेला फडणवीस का भेटले?
माझे दाऊदच्या बायकोबरोबर बोलणे सुरु आहे? असा आरोप हॅकर्स मनीष भंगाळे याने केला. देशभर हे प्रकरण गाजत असताना त्याच दिवशी हा मनीष भंगाळे मध्यरात्री दीड वाजता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला. त्याच्यासोबत कृपाशंकर सिंह देखील होते. त्याचवेळी त्यांच्या भेटीची छायाचित्रे माझ्याकडे आली होती. देवेंद्र फडणवीसांना रात्री दीड वाजता मनीष भंगाळे याला भेटण्याचे कारण काय ? असा सवाल देखील खडसे यांनी केला आहे. तेथून मनात शंका आली. त्यानंतर पुन्हा माझ्या जावयाने लिमोझी कार घेतली, मी एमआयडीसीची जमीन विकत घेतली, असे निराधार आरोप करण्यात आले. जमीन खरेदीची झोटींग समितीकडून चौकशी करण्यात आली. त्या अहवालात देखील काही तथ्य नव्हते.
मंत्र्याचा पीए व एका महिलेची माझ्याकडे क्लीप-
माझ्यावर आरोपांचे हे षडयंत्र होते. हे षडयंत्र कुणी केले? कसे केले? त्यात कोण होते? कोणत्या मंत्र्याचे पीए होते? कोण अंजली दमानिया यांना भेटत होते, याच्या व्हिडीओ क्लीप देखील माझ्याकडे आहेत. मी हे पुरावे वरिष्ठांना देखील दाखविणार आहे. काही पुरावे मी यापूर्वीच वरिष्ठांना दाखविल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. तसेच एका मंत्र्याचा पीए व एका महिलेची अश्लील छायाचित्रे देखील माझ्याकडे होते, ते देखील मी वरिष्ठांना देऊन या मंत्र्यांचे व त्याच्या लोकांचे काय उद्योग आहेत, त्याचीही माहिती वरिष्ठांना दिल्याचे खडसे म्हणाले.
...म्हणून केले तिकीट कापायचे उद्योग-
मी काय गुन्हा केला की, तुम्ही मला राजीनामा देण्यास भाग पाडले. माझ्या मुलीला तिकीट देऊन तिला हरविण्याची व्यवस्था केली. आमच्याच पक्षातील काही लोकांना सांगून विरोधात प्रचार करायला लावला. त्याचे पुरावे देखील चंद्रकांत पाटील व फडणवीसांना मी दिलेत, त्यांनी कारवाई करतो, असे सांगितले. पण सहा महिने झाले तरी, कोणतीही कारवाई केली नाही. पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता व मी अशा शंभर टक्के निवडून येणाऱ्या जागा तिकिट न देता भाजपने हाताने घालवल्या. मुख्यमंत्रीपदाला कुणी आडवे येऊ नये, म्हणूनच हे उद्योग केल्याचा आरोप देखील खडसे यांनी केला. या सर्व प्रकाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, या सत्य व पुराव्याच्या आधारे मी एक पुस्तक लिहणार आहे. त्याचे नाव 'नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान' असे असणार असल्याचेही खडसे म्हणाले. केवळ या व्यक्तीमुळे महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले नाही. त्यांनी याचे तिकीट कापा, त्याचे तिकीट आणा, बाहेरचे लोक आणा, मधले काढा, जवळचे सोडा, वरचे आणा, असे उद्योग केले. या तिकीटांच्या काटाकाटी व पाडापाडीमुळेच पक्षाचे नुकसान झाले, असा दावाही खडसेंनी केला. मी एकटाच नाही तर, भाजपत अनेक नेते अस्वस्थ आहेत. आम्ही कधीही भाजपच्या विरोधात बोललो नाही. केवळ व्यक्तीविरोध केला असेल. आता पुन्हा एकदा प्रयत्न करुन पाहू. वरिष्ठांशी बोलू, असेही खडसे यांनी शेवटी सांगितले. सध्या कोरोनाचा संसर्ग असल्याने परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर पुढील पाऊल उचलणार असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. यावेळी पक्षाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे. तसे झाले नाही तर मात्र, मी आता माझा निर्णय घेईन, असेही खडसेंनी सांगितले.