जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. जळगाव शहरासह भुसावळ व अमळनेर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मंगळवारपासून ७ दिवसांसाठी जळगाव शहरासह भुसावळ व अमळनेर तालुका पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली. याबाबतचे आदेश शनिवारी पारित करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशानुसार मंगळवार (दि. ७ जुलै) ते सोमवार (दि. १३ जुलै) पर्यंत ७ दिवस जळगाव शहर, भुसावळ व अमळनेर तालुक्यात हे लॉकडाऊन असणार आहे. या काळात औषधी दुकाने, दूध विक्री व खरेदी व्यवहार सुरू राहणार आहेत. मात्र, स्थानिक नागरिकांना त्यांचा रहिवासाचा प्रभाग असणाऱ्या भागातच खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार आहेत. साहित्य खरेदी करण्यासाठी दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहन घेवून जाण्यासाठी परवानगी मिळणार नाही. तीन तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत क्षेत्रातच ठोक व घाऊक खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू राहणार आहेत.
लॉकडाऊन कालावधीत लग्न समारंभासाठी ५० व्यक्ती मर्यादित उपस्थित राहू शकतील. याची परवानगी स्थानिक प्रशासन व पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील. तर अंत्यविधीसाठी केवळ २० व्यक्तीच उपस्थित राहू शकतील. तीनही तालुका क्षेत्रातील पेट्रोल, डिझेल चालक व मालक यांना सुट देण्यात आलेली आहे. शासकीय वाहनांना शासकीय ओळखपत्र पाहून पेट्रोल-डिझेल विक्री करावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा - जळगाव: तरुणाची गळफास घेऊन तर वृद्धाची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या
हेही वाचा - धक्कादायक; जळगाव जिल्ह्यात 168 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 7 जणांचा मृत्यू