जळगाव - दंड भरल्याचा अहवाल देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच घेतल्याने जवखेडा (ता. अमळनेर) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी रंगेहात अटक केली. मुकेश सुरेश देसले, (वय ४४, रा. सुर्या नगर, नकाणे रोड, आधार नगरजवळ, धुळे) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
लाचखोर तलाठी मुकेश देसले हा अमळनेर तालुक्यातील जवखेडा गावात तलाठी म्हणून नियुक्तीला आहे. या प्रकरणातील तक्रारदाराकडून त्याने १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची जवखेडा येथे इंग्लिश मीडियम शैक्षणिक संस्था असून, ती शेतजमिनीवर असल्याबाबत त्यांना तहसीलदाराने नोटीस दिली होती. त्यानुसार त्यांनी ३२ हजार ४२६ दंड भरला. सदर दंड भरल्याचा अहवाल देण्याच्या मोबदल्यात आरोपी मुकेश याने १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम आरोपीने आज दुपारी तलाठी कार्यालयात स्वीकारली. त्याचवेळी त्याला रंगेहात अटक करण्यात आली.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू-
दरम्यान, १५ हजार रुपयांची लाच घेतल्याने मुकेश देसले याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, मुकेश याच्या संपर्कात महसूल विभागातील कुणी अधिकारी आहे का? याचाही तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहेत.