जळगाव - दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस पूर्णत्वास येणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडल्या होत्या. मात्र, आता आचारसंहिता संपल्याने या प्रक्रियेने वेग घेतला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी अपडेट केली असून पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडून मार्गदर्शन मागवले आहे. येत्या दोन दिवसात शासनाचे मार्गदर्शन प्राप्त होऊन पुढील आठवड्यात बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
यावर्षी बदली प्रक्रियेत विनंती बदल्यांची संख्या अधिक असून प्रशासकीय बदल्यांची संख्या कमी आहे. दरवर्षी जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात करण्यात येतात. त्या दृष्टीने प्रशासनाला सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध कराव्या लागतात. मात्र, या वर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या नव्हत्या. आता आचारसंहिता संपुष्टात आल्याने कोणत्याही क्षणी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा परिषदेत धडकण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरुन जिल्हा परिषद प्रशासनाने संपूर्ण विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता याद्या अपडेट करून ठेवल्या आहेत. शासनाला मार्गदर्शन मागून बराच कालावधी लोटला असून, येत्या एक ते दोन दिवसात बदल्यांबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
३० मे पर्यंत अर्ज नोंदणी
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या दृष्टीने ग्रामविकास विभागाने पावले उचलली आहेत. सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शाळांची माहिती भरून पाठविण्यात याव्यात, अशाही सूचना देण्यात आल्या होत्या. यात प्रामुख्याने ज्या शाळेत शिक्षक नाहीत किंवा कोणत्या शाळेत शिक्षकांची आवश्यकता आहे, अशा सर्वांची माहिती घेण्यात आली. शनिवारपासून शिक्षकांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. शिक्षकांना २० जागांचा पर्याय प्रशासनाकडून देण्यात येणार आहे. ३० मे पर्यंत शिक्षकांना अर्ज भरता येणार आहे.