जळगाव - राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठ व सर्व महाविद्यालयांना १४ एप्रिलपर्यंत सुट्या जाहीर केल्या आहेत. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना घरी राहुन कामकाज करण्याची सूचना केलेली आहे. या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संगणकाद्वारे विविध ऑनलाईन प्रणालीच्या आधारे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरून कामकाज करण्याची व्यवस्था केली आहे.
वर्गखोलीतील शिक्षण आणि कार्यालयातून काम हे अपरिहार्यच आहे. मात्र, प्राप्त परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून विद्यापीठाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यां करीता घरबसल्या शिक्षण पूर्ण करण्याकरता ऑनलाइन शिक्षण व्यवस्थापन प्रणाली (एल. एम. एस.)च्या आधारे १८ मार्चपासूनच अभ्यासक्रमाचे व्हिडिओ, व्याखाने व प्रश्नसंच उपलब्ध करून दिलेली आहेत. या अभ्यासक्रमाच्या साहित्यामध्ये प्राध्यापक घरी बसून उपलब्ध साधनांद्वारे जसे की मोबाइल, वेब कॅमेरा, संगणक, लॅपटॉप आदींचा वापर करीत व्हिडिओ, व्याखाने व प्रश्नसंच आजही ऑनलाइन उपलब्ध करून देत आहेत. एकूण १३००० प्रश्नांसह साधारण १० पेक्षा जास्त विषयांचे प्रश्नसंच, ३० व्हिडिओज या व्यतिरिक्त ऑनलाइन शिक्षण व्यवस्थापन प्रणालीमध्ये विद्यापीठाने विविध उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेली आहे. यासर्व ऑनलाइन सुविधांचा वापर करण्यासंदर्भात विद्यापीठ परिसरातील १६०० विद्यार्थ्यांना १७ मार्चला त्यांच्या व्यक्तीगत ईमेलवर तसे कळवण्यात आले होते.
जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान विद्यापीठातील सर्व विद्यार्थी तथा शिक्षकांना गुगल क्लासरूम बाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. या अनुषंगाने शिक्षक गुगल क्लासरूमचा वापर करत घरी बसून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. गुगल क्लासरुममध्ये शिक्षक, विषयांच्या संदर्भातील पॉवर-पॉईंट, नोट्स, ई-बुक्स् तसेच क्वीझ, असाइनमेंटस् यांचा वापर करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यासोबतच विद्यापीठाने प्रशासकीय कामकाजाकरीता विकसित केलेल्या संगणक प्रणालींद्वारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करणे सुलभ होत आहे.