जळगाव - जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या कुऱ्हाड खुर्द गावातील एका जवानाने कर्तव्यावर असताना, स्वतःवर रायफलने गोळी झाडत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पश्चिम बंगाल राज्यातील हाजीपूर वैशाली येथे घडली. ईश्वर गिरधर चौधरी (वय ३३) असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे.
ईश्वर हे सशस्त्र सीमा बलमध्ये सेवारत होते. ते जुलै २०११ मध्ये सैन्य दलात भरती झाला होते. सध्या त्यांची नेमणूक सशस्त्र सीमा बलच्या ६५ बटालियनमध्ये बिहार राज्यात होती. ही बटालियन पश्चिम बंगाल राज्यातील हाजीपूर वैशाली येथे असताना रविवारी सायंकाळी त्यांनी स्वतःच्या ताब्यात असलेल्या रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
ईश्वर यांनी आत्महत्या केल्याची माहिती निरीक्षक गार्ड शंभुनाथ बारमन यांनी वरिष्ठांना कळवली. त्यानंतर या घटनेची माहिती ईश्वरच्या कुटुंबियांना देण्यात आली. दरम्यान, ईश्वरच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. ईश्वर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, २ मुले, मोठा भाऊ असा परिवार आहे. त्यांचे मोठे भाऊ देखील सैन्यात निवृत्त जवान आहेत. या प्रकारामुळे गावात शोककळा पसरली आहे.