जळगाव - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मोठ्या उत्साहात मतदारांनी मतदान केल्यानंतर, आज (सोमवारी) मतमोजणी प्रक्रिया होऊन निकाल समोर येणार आहेत. निकालाबाबत सर्वच ग्रामपंचायतीत कमालीची उत्सुकता आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून, सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी 2 वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल, असा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात 5 हजार 154 जागांचे निकाल समोर येऊन 13 हजार 847 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होईल.
जिल्ह्यात तालुकास्तरावर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. काही ठिकाणी तहसील कार्यालयात तर काही ठिकाणी सोयीच्या जागी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासनाच्या वतीने योग्य ती पूर्वतयारी करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने सर्वच मतमोजणी केंद्राच्या आवारात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींच्या निकालाकडे लक्ष -
जळगाव तालुक्याची मतमोजणी नूतन मराठा महाविद्यालयात होणार आहे. त्यासाठी एकूण 10 टेबलावर मतमोजणी होणार आहे. एकावेळी 10 टेबलावर मतमोजणी होईल. एका टेबलावर तीन कर्मचारी असतील. त्यावर पर्यवेक्षक असेल. एकाच वेळी सर्व टेबलावर एकाच ग्रामपंचायतीची मतमोजणी होईल. एकूण 18 फेऱ्यात मतमोजणी होईल. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाची कसोटी आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेले आसोदा, तृतीयपंथी अंजली पाटील यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आलेले भादली या गावांच्या निकालाची उत्सुकता आहे.
गुलाबराव पाटलांच्या पाळधीत काय होणार?
शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी खुर्द ग्रामपंचायतीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. याठिकाणी विकास आणि परिवर्तन अशा दोन पॅनेलमध्ये थेट लढत असून, कोणते पॅनल बाजी मारते? याची उत्सुकता आहे.
हेही वाचा - भुसावळ : हवेत गोळीबार करून पळ काढणारे पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात
हेही वाचा - जळगावचे उद्योजक सर्वेश मणियार यांची आफ्रिकेत हत्या