जळगाव - पाळधी येथील एका ५० वर्षीय व्यक्तीच्या विरोधात असलेल्या तक्रारीच्या संदर्भात गुन्हा दाखल न करण्यासाठी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हवालदाराने ५ हजार रुपयांची लाच घेतली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली. लाच दिल्यानंतर तक्रारदाराने तोंडावरील मास्क खाली करण्याचा कोडवर्ड ठरला होता. त्याप्रमाणे सापळा यशस्वी झाला. सतीश रमेश पाटील (वय ४३, रा. पिंप्राळा) असे अटक केलेल्या लाचखोर हवालदाराचे नाव आहे.
सतीश पाटील हा नशिराबाद पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल पदावर नाेकरीस आहे. दरम्यान, पाळधी (ता.धरणगाव) येथील एका व्यक्तीच्या विरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल होता. या अर्जाची चौकशी सतीश पाटील याच्याकडे होती. गुन्हा दाखल न करण्यासाठी पाटील याने गुरुवारी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक गोपाल ठाकूर, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, रवींद्र माळी, अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील, सुनील शिरसाठ, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने नशिराबाद पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचला होता.
तक्रारदाराने पाटील याच्या हातात ५ हजार रुपयांची लाच देताच तोंडावरील मास्क खाली काढावा, असा कोडवर्ड ठरला होता. त्यानुसार तक्रारदाराने मास्क खाली ओढताच सापळा रचून बसलेल्या पथकाने पाटील याला रंगेहात अटक केली. पाटील याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.