जळगाव - रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची भाव वाढ झाल्याने स्थानिक बाजारपेठेत सोने चांगलेच कडाडले आहे. आठवडाभरात सोन्याचे भाव ८०० रुपये प्रती तोळ्याने वाढून ३२ हजार ९०० ते ३३ हजार १०० रुपयांवर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, अक्षय्य तृतीयेनंतर ही भाव वाढ झाली आहे.
मार्चनंतर दोन महिन्यांनी सोन्याचे भाव पुन्हा एकदा ३३ हजारांवर गेले आहेत. एकीकडे दुष्काळ असला तरी लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून चांदीचे भाव प्रतिकिलोमागे ३९ हजारांवर स्थिर आहेत. अडीच महिन्यांत चांदीचे भाव थेट तीन हजार रुपये प्रती किलोने कमी झाले होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांदीच्या भावात वाढ झाली. आता चांदी ३९ हजार रुपये प्रतिकिलोवर स्थिरावली आहे.
गेल्या आठवड्यात ६९.६२ रुपये मूल्य असलेले डॉलरचे दर ७०.३५ रुपयांवर पोहोचले आहेत. परिणामी सोन्याचे भाव वाढले आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने १०० रुपयांनी कमी होऊन ३२ हजार १०० रुपयांवर आले होते. मात्र, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सोन्याच्या भावात दररोज वाढ होत आहे.
रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढले आहेत. त्याचा परिणाम स्थानिक सराफ बाजारावर झाला आहे. दुसरीकडे लग्नसराई सुरू असल्यामुळे सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत.