जळगाव - राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील प्रतिनिधित्व करत असलेल्या धरणगाव विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या धरणगाव शहरात तर ऐन हिवाळ्यात आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. यामुळे संतापलेल्या धरणगावकरांनी आज दुपारी नगरपालिकेवर धडक 'जन आक्रोश हंडा मोर्चा' काढत निष्क्रिय नगरपालिका प्रशासन तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला.
गेल्या दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. असे असताना धरणगाव शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघालेला नाही. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना केवळ योग्य नियोजनाअभावी नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होऊ शकत नाही. कृत्रिम पाणीटंचाईला धरणगावकर कंटाळले आहेत. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा यंत्रणेला शिस्त लागत नसल्याने सोमवारी नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला. महिला तसेच आबालवृद्ध डोक्यावर पाण्याचे खाली हंडे घेऊन नगरपालिकेवर धडकले. मोर्चा नगरपालिकेवर धडकल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला पाहिजे, अशी एकमुखी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
![handa morcha in dharangaon municipal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-jlg-03-dharangaon-people-agitation-7205050_21122020130955_2112f_1608536395_917.jpg)
महिलावर्गाने व्यक्त केला संताप-
मोर्चेकऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. दैनंदिन कामात महिलांना पाणीटंचाईमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे आहे. दररोज दिवस उगवल्यानंतर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. नगरपालिका नागरिकांना मूलभूत सुविधा देखील पुरवू शकत नसेल तर काय उपयोग? सत्ताधाऱ्यांनी खुर्च्या सोडाव्यात, असा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी यावेळी व्यक्त केल्या. काही महिलांनी नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाण्याची मातीची भांडी फोडून निष्क्रिय प्रशासनाचा निषेध नोंदवला.
![handa morcha in dharangaon municipal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-jlg-03-dharangaon-people-agitation-7205050_21122020130955_2112f_1608536395_258.jpg)
नगरपालिकेवर आहे शिवसेनेची सत्ता-
धरणगाव नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे पदाधिकारी सत्ता सांभाळत आहेत. असे असताना शहरात ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई भासत असल्याने मोर्चेकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, काही तांत्रिक कारणास्तव पाणीपुरवठा यंत्रणेत व्यत्यय निर्माण झाल्याने ही स्थिती उद्भवली आहे. लवकरच शहरातील पाणीप्रश्न निकाली काढू, असे आश्वासन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.
हेही वाचा - येत्या दोन दिवसांमध्ये तोमर घेणार आंदोलक शेतकऱ्यांची भेट - अमित शाह