जळगाव - लग्नाचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तासह तीन जणांविरुद्ध शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सुभाषराव पाटील, असे आरोपी आयुक्ताचे नाव आहे. तसेच त्याची पत्नी सीमा पाटील आणि वडील सुभाषराव पाटील यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित तरुणी ही शहरातील रहिवासी असून ती सामाजिक न्याय विभागाच्या 'बार्टी' प्रकल्पात कंत्राटी पद्धतीने समाजदूत म्हणून काम करत आहे. संशयित आरोपी योगेश पाटील याची तिच्याशी जिल्हा उप कारागृहात झालेल्या एका कार्यक्रमात भेट झाली होती. त्यानंतर पाटीलने तिच्या व्हॉट्सअॅपवर कामाचा बहाणा करत संदेश पाठवले. सुरुवातीला कामाची विचारणा केल्यानंतर तो तिला वैयक्तिक संदेश पाठवू लागला. ओळख वाढल्यानंतर त्याने तिला जेवणाचा डबा घेऊन घरी बोलावले. तेथे तिची वैयक्तिक पार्श्वभूमी जाणून घेतली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तसेच कायमस्वरूपी नोकरीच्या बहाण्याने नोव्हेंबर २०१८ ते ३ मे २०१९ या कालावधीत वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, पुढे जाऊन तिने नकार दिल्यानंतर त्याने तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पीडितेने तिच्या आईला सोबत घेऊन त्याचे वडील सुभाषराव पाटील आणि पत्नी सीमा पाटील यांना हा प्रकार सांगितला. मात्र, त्यांनी देखील दोघांना धमकावले. अखेर पीडितेने या प्रकारसंदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पीडित तरुणी तक्रार दाखल करण्यासाठी रामानंदनगर पोलीस ठाण्यात २३ जूनच्या रात्री गेली होती. मात्र, रामानंदनगर पोलिसांनी सुरुवातीला तिची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. तसेच उलट तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मात्र, या प्रकारणासंदर्भात तिने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मध्यरात्रीनंतर तिची तक्रार दाखल करून घेण्यात आली. गुन्हा दाखल होऊन १२ तास उलटले असले तरी संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणात पोलिसांनी चिरीमिरी केल्याचा संशय असल्याचा आरोप देखील पीडित तरुणीने केला आहे.