जळगाव - मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारची मानसिकताच उलटी आहे. त्यामुळेच आज आरक्षण स्थगित होण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात भाजपाचे माजीमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आमच्या सरकारने सखोल अभ्यास करून कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण दिले होते. मात्र, आताच्या सरकारने न्यायालयात व्यवस्थित लढा दिला नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले.
जळगाव शहरातील विविध समस्यांबाबत गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, 2014मध्ये आमचे सरकार येण्यापूर्वी तत्कालीन सरकारने घाईघाईत आरक्षण दिले होते. ते आरक्षण एका दिवसात न्यायालयाने नाकारले होते. त्यानंतर आमचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाने केलेल्या मागणीनुसार आम्ही आरक्षण दिले. आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या समितीमध्ये मी होतो. तेव्हा आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावेळी आम्ही तज्ञ वकील दिले. व्यवस्थितपणे बाजू मांडत आरक्षण टिकवले होते. परंतु, दुर्दैवाने राज्यात सरकार बदलले. आताच्या सरकारने न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारले आहे. आता हा मुद्दा खंडपीठात गेला आहे. त्याठिकाणी किती वेळ लागतो, हे सांगता येणार नाही, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.
आम्हाला सूचना; खडसेंच्या बाबतीत बोलायचे नाही -
पत्रकारांनी गिरीश महाजन यांना एकनाथ खडसेंच्या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवत या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. गिरीश महाजन म्हणाले की, आम्हाला पक्षाकडून सूचना आहेत की, एकनाथ खडसेंच्या बाबतीत काहीही बोलायचे नाही. या विषयावर आमचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खडसेंना प्रत्युत्तर देतील. एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते मुख्यमंत्री होण्याच्या कॅटेगरीतले नेते आहेत. त्यामुळे त्यांना मोठे नेतेच प्रत्युत्तर देतील. आम्ही तर लहान कार्यकर्ते आहोत, असा टोला मारत गिरीश महाजन यांनी अधिक बोलणे टाळले.