जळगाव - उत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांच्या आठही जागा महायुतीच्या निवडून येतील, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. रावेर लोकसभेसाठी गुरुवारी दुपारी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते.
महाजन म्हणाले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि नगर या जिल्ह्यातील आठही जागा १०० टक्के भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या युतीच्या निवडून येतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही. लोकांचा विश्वास आमच्या पक्षावर, आमच्यावर आहे. लोकांना खाली उमेदवार डावा-उजवा असला तरी देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदींना बसवायचे आहे. देशाची सूत्रे त्यांच्या हाती द्यायची आहेत. मोदींच्या हातातच देश सुरक्षित राहू शकतो. दुसरीकडे ६० पक्ष एकत्र आले आहेत. पण त्यांच्याकडून पंतप्रधान कोण होईल हे निश्चित नाही. त्यांच्यात एकाने पंतप्रधानांचे नाव जाहीर केले तर बाकीचे माघार घेत आहेत. पळून जात आहेत. मला वाटत अशा लोकांच्या पाठीशी कोणी उभे राहणार नाही. देशात काँग्रेस ३ आकडी संख्याही गाठणार नाही. २ आकडी संख्येत काँग्रेस सिमीत राहील पण तो आकडा नेमका किती राहील हे सांगता येणार नाही. काँग्रेस शतक गाठणार नाही, ही अवस्था त्यांची आहे, असे महाजन म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन गायब
राष्ट्रवादी काँग्रेसविषयीतर बोलायलाच नको. त्यांचे कॅप्टन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. पण ते बाद झाले आहेत. टीममधूनच गायब झाले आहेत. त्यांच्याबद्दल बोलायलाच नको, अशीही टीका गिरीश महाजन यांनी यावेळी केली.