जळगाव - वेगवेगळ्या शहरांमधून दुचाकी चोरून त्या कमी किंमतीत विकणाऱ्या चोरांच्या टोळीला पकडण्यात धरणगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या 20 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. चोरट्यांची सखोल चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून चोरीच्या अजून दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भूषण विजय पाटील (रा. पळासखेडा सिम, ता. पारोळा), भूषण धनराज पाटील, अमोल नाना पाटील (दोघे रा. शनिमंदिर चौक पारोळा), जयेश रवींद्र चव्हाण (रा. जवखेडा, ता. अमळनेर), ज्ञानेश्वर राजेंद्र धनगर (रा. वर्डी, ता. चोपडा) आणि पंकज मधुकर खजुरे (रा. राजीव गांधीनगर, पारोळा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
चोरटे असे आले जाळ्यात -
धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील जयेश पाटील या तरुणाकडे एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी असल्याची माहिती धरणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जयेश याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने भूषण विजय पाटील याच्याकडून दुचाकी घेतल्याची माहिती मिळाली. नंतर पोलिसांनी भूषणला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याने भूषण धनराज पाटील व अमोल पाटील या दोघांकडून 9 दुचाकी कमी किमतीत घेतल्याचे समोर आले. या साऱ्या घटनाक्रमात दुचाकी चोरीचे रॅकेट सक्रिय असल्याचे पोलिसांना समजले. नंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत भूषण व अमोलला अटक केली. या दोघांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी दुचाकी चोरून त्या कमी किंमतीत विकल्याचे समोर आले. हे दोघे चोरीच्या दुचाकी ते जयेश चव्हाण, ज्ञानेश्वर धनगर आणि पंकज खजुरे यांच्या मदतीने लोकांना विकत होते. दुचाकी कमी किंमतीत विकताना ते संबंधित व्यक्तीला कागदपत्रे नंतर देऊ, असे सांगत असल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता-
दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अटकेतील आरोपींनी जिल्ह्यात ठिकठिकाणी दुचाकी चोरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे अजून गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे. त्यांनी चोरीच्या दुचाकी कोणाकोणाला विकल्या आहेत, याची माहिती पोलीस काढत आहेत.