जळगाव - जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. शनिवारी एका दिवसात तब्बल 111 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3082 इतकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शनिवारी 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृत्यूची संख्याही 221 वर गेली आहे.
जिल्हा प्रशासनाला शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जिल्ह्यातील 111 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर 55, भुसावळ 17, जळगाव ग्रामीण आणि एरंडोल प्रत्येकी 8, धरणगाव 6, रावेर आणि बोदवड प्रत्येकी 4, यावल आणि जामनेर प्रत्येकी 3 तसेच चोपडा, पाचोरा आणि पारोळा येथील प्रत्येकी 1 अशा एकूण 111 रुग्णांचा त्यात समावेश आहे. जळगाव शहरात शनिवारी देखील सर्वाधिक 55 रुग्ण आढळून आल्याने येथील रुग्णसंख्या 661 वर जाऊन पोहोचली आहे. त्या खालोखाल रुग्ण भुसावळ शहरात आहेत. भुसावळात देखील शनिवारी तब्बल 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे भुसावळची रुग्णसंख्या 407 वर पोहोचली आहे.
जळगाव जिल्ह्यात आजअखेर 1022 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील 163 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. समाधानाची बाब म्हणजे, आतापर्यंत जिल्ह्यातील 1839 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 221 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी 7 जणांचा मृत्यू झाला. त्यातील चौघांचा मृत्यू कोविड रुग्णालयात तर 3 जणांचा मृत्यू डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेजमध्ये झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये चोपडा येथील 75 वर्षीय वृद्धा, भुसावळ तालुक्यातील 35 वर्षीय महिला, एरंडोल तालुक्यातील 67 वर्षीय वृद्ध, धरणगाव तालुक्यातील 65 वर्षीय वृद्धा, पारोळा तालुक्यातील 87 वर्षीय वृद्ध तसेच रावेर येथील 48 वर्षीय पुरुष आणि 83 वर्षीय वृद्धेचा समावेश आहे.
कोरोना अपडेट
जळगाव शहर 661
जळगाव ग्रामीण 103
भुसावळ 407
अमळनेर 285
चोपडा 214
पाचोरा 75
भडगाव 163
धरणगाव 132
यावल 146
एरंडोल 115
जामनेर 151
रावेर 219
पारोळा 211
चाळीसगाव 33
मुक्ताईनगर 25
बोदवड 42
इतर जिल्ह्यातील 10
एकूण रुग्णसंख्या 3082