जळगाव : जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी झाल्यानंतर पिके ऐन बहरलेल्या अवस्थेत आहेत. पिकांना सध्या खतांची आवश्यकता असताना ऐन हंगमातच शेतकऱ्यांना खतांच्या टंचाईला सोमोरे जावे लागत आहे. मागणी केलेली खते मिळत नाहीत, उपलब्ध असल्यास जास्त दराने खरेदी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. त्यासोबतच खरीप पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मूग, सोयाबीन यासह अनेक पिकांचे उत्पादन जळगाव जिल्ह्यातील शेतकरी घेतो. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत आहे. रासानिक खत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. जळगाव, अमळनेर, एरंडोल, भुसावळ, मुक्ताईनगर, चोपडा, यावल आदी तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली खते मिळत नसल्याची स्थिती कायम आहे. अनेक भागात शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा आजही जाणवत आहे. इतरही अनेक खते मागणीनुसार मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. येत्या आठ दिवसात खतांचा पुरवठा नाही झाल्यास खरीप पिकांचे प्रचंड नुकसान होईल, अशी भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक लूट
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना जादा दरात खतांची खरेदी करावी लागत आहे. युरिया १०.२६.२६. आणि दाणेदार फॉस्फेटची टंचाई सर्वत्र आहे. डीएपीचा सध्याचा दर प्रतिपिशवी १,२०० ते १,२५० रुपये आहे. मात्र, बाजारात हेच खत १,३०० ते १,४०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. युरियाचा दर २६७ रुपये आहे, पण त्यालाही ३५० ते ४०० रुपयांपर्यंत दर आकारला जात आहे. याला पर्याय म्हणून डीएपी व पोटॅश हे महागडे खत शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात खताची टंचाई नाही मात्र, मागणीत वाढ झाली आहे. कोविडमुळे शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याच पातळीवर खतांची जादा खरेदी करुन साठा करुन ठेवला आहे. तसेच मॉन्सूनआधी सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे खत वापर आणि मागणीत उसळी दिसते आहे. अशी माहिती अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर यांनी दिली.