जळगाव - जिल्ह्यात शनिवारी पुन्हा १६९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजार १७६ इतकी झाली आहे. आज (शनिवारी) एकाच दिवशी ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. आतापर्यंत कोरोना बळींची संख्या २६३ झाली आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाला शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकूण १६९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात जळगाव शहर ५७, जळगाव ग्रामीण १२, अमळनेर १८, भुसावळ ९, भडगाव ३, बोदवड १६, चाळीसगाव २, चोपडा ४, धरणगाव ३, एरंडोल १४, जामनेर १४, मुक्ताईनगर १, पाचोरा १, पारोळा २, रावेर ५ आणि यावल येथील ८ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत १४३७ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील २०६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत २४७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी १४१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.
शनिवारी तब्बल ११ जणांचा मृत्यू -
शनिवारी जिल्ह्यातील ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जळगाव शहरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ५८ वर्षीय महीला, ४५ वर्षीय पुरुष, ६७ वर्षीय महीला, ४८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जळगाव तालुक्यात ४५ वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यात ६२ वर्षीय महीला, भडगाव ६५ वर्षीय महीला, अमळनेर तालुक्यात ६७ वर्षीय महीला, पाचोरा तालुक्यात ३६ वर्षीय पुरुष तर जामेनर तालुक्यात ४९ वर्षीय पुरुष व ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.