जळगाव - जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे भाजपाचा राजीनामा देऊन आता राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. पक्षांतरानंतर खडसे व भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, भाजपाच्या पक्ष कार्यालयात मात्र, खडसे यांची एक प्रतिमा अद्यापही कायम असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भाजपाचे जळगाव जिल्हा कार्यालय अर्थात 'वसंत स्मृती' जळगावातील बळीरामपेठेत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीवासी झाल्यानंतर हे कार्यालय चर्चेत आले आहे. कारण या कार्यालयात मुख्य प्रवेशद्वाराजवळ भाजपाच्या जिल्हाध्यक्षांचा कार्यकाळ दर्शवणारा नाम फलक आहे. या फलकाजवळ खडसेंची प्रतिमा आहे. ही प्रतिमा खडसेंनी राजीनामा देऊन चार दिवस पूर्ण झाल्यानंतर देखील हटवण्यात आलेली नाही. आज कोअर कमिटीच्या बैठकीच्या निमित्ताने या कार्यालयात माजीमंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह वरिष्ठ नेते व पदाधिकारी आले होते. यावेळी अनायासेच काही नेत्यांचे या प्रतिमेने लक्ष वेधले.
खडसेंचा अजूनही भाजपमध्ये आदरयुक्त दरारा
त्यानंतर या विषयावरून नेत्यांमध्ये कुजबूज सुरु झाली. मात्र, खडसेंची ती प्रतिमा काढेल कोण? किंवा तसेच स्पष्ट बोलेल कोण? याची धास्ती घेत एकेका पदाधिकाऱ्याने काहीही न बोलता कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यामुळे आजही खडसे यांचा पक्ष व पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला आदरयुक्त दरारा अधोरेखित झाला.
दरम्यान, या प्रकारासंदर्भात पत्रकारांनी गिरीश महाजन यांना छेडले असता, महाजन यांनी सांगितले की, खडसे यांनी आता पक्ष सोडला आहे. त्यामुळे आता त्यांची प्रतिमा हटविण्यात येईल, असे स्पष्ट करुन महाजन देखील कार्यालयातून निघून गेले. परंतु, त्यानंतरही खडसेंची प्रतिमा 'जैसे थे'च आहे.