जळगाव - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात १६ हजार ३२४ शेतकऱ्यांना १०२५ शेतकरी गटांमार्फत ६०५६ मेट्रिक टन खते, १२२० क्विंटल बियाणे, २८ हजार ५४५ कपाशीच्या बियाण्याच्या पाकिटांचा बांधावर पुरवठा करण्यात आला. ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना लॉकडाऊनच्या कालावधीत खते, बियाणे व कीटकनाशके या निविष्ठा खरेदी करताना अडचणी येऊ नये, याकरिता जिल्हाभर बांधावर कृषी निविष्ठा पुरवण्याबाबत मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी कृषिमंत्र्यांच्या आवाहनानुसार नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना सूचना केल्या होत्या. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी हे ग्रामपातळीवर शेतकरी गट व कृषी सेवा केंद्र यांचे समन्वयक म्हणून काम करीत आहे. शेतकरी गटांमार्फत निविष्ठा खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च कमी होऊन वेळ व पैशांची बचत झाली. या शिवाय गुणवत्तापूर्वक व दर्जेदार निविष्ठा मिळण्यासही मदत झाली.
यामध्ये विशेष बाब म्हणून जमीन आरोग्य पत्रिकेवर आधारित रासायनिक खतांचा संतुलित मात्रा कृषी सहाय्यकांमार्फत काढून देण्यात येत आहे. त्यानुसारच योग्य त्या खतांची मात्रा निश्चित करून सरळ घाऊक विक्रेता ते शेतकरी गटांद्वारा जोडणी करून घेऊन वेळ व पैसा देखील वाचवण्यात येत आहे. शिवाय अनावश्यक रासायनिक खतांची मात्रा दिली जात नसल्याने शेतकऱ्यांचा खर्चही वाचत आहे. कापूस बियाण्यांच्या बाबतीत एक गट-एक वाणमुळे एकाच कालावधीत पीक निघाल्याने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल, असा कृषी विभागाचा दावा आहे.