जळगाव - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस. टी. बस चालकाला कर्नाटक राज्यातील विजापूर आगारात वाहतूक नियंत्रकाने धकबुक्की करत मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी जळगाव आगारात एस. टी. कामगार सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा फलक पायदळी तुडवत तीव्र भावना व्यक्त केल्या.
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विरोधात आज जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी तीव्र निदर्शने केली. ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या बसेस कर्नाटक राज्यात जात असतात; त्याचप्रमाणे कर्नाटक राज्याच्या बसेस देखील महाराष्ट्रात येत असतात. मात्र, महाराष्ट्र राज्याच्या एस.टी. बसला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून तेथील कर्मचारी व अधिकारी नित्यनियमाने महाराष्ट्राच्या चालक-वाहकांना त्रास देत असतात. अशीच एक मारहाणीची घटना विजापूर येथे घडली आहे. मेढा-विजापूर बसच्या चालकाला विजापूर आगाराच्या वाहतूक नियंत्रकाने धक्काबुक्की करत मारहाण केली. बसचे परमिट असताना सुद्धा बस फलाटाला का लावली, म्हणून कर्नाटकच्या वाहतूक नियंत्रकांनी बसचालक आशिष नायकवडी यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. यापूर्वीही अनेकदा एस.टी. कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्याने एस.टी. कामगार सेना संतप्त झाली आहे.
एस.टी. कर्मचाऱ्यांनी जळगाव आगारात निदर्शने करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रातील चालक व वाहकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांना आळा बसावा तसेच असे प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी झाली. या प्रसंगी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन सेवेचा धिक्कार करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.