जळगाव - जिल्ह्यात गुरुवारी मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा बसला. वादळ आणि वाऱ्यामुळे शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. केळीच्या बागा वादळामुळे आडव्या झाल्या असून, शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.
रावेरमध्ये 2 तास मुसळधार पाऊस
रावेर तालुक्यात गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. खेर्डी, विटवा, ऐनपूर, निंबोल, सुरवाडी, वाघाडी या परिसरात जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खेर्डी गावातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. वादळामुळे विजेचे पोल तसेच डेरेदार वृक्षही उन्मळून पडले.
मुक्ताईनगरला वादळाचा फटका
मुक्ताईनगर तालुक्यात गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाले. अंतुर्ली मंडळातील उचंदा, शेमळदेसह अनेक गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले तर दुकाने तसेच टपऱ्यांचेही नुकसान झाले आहे.
केळींचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर संकटात
या पावसामुळे रावेरसह मुक्ताईनगर तालुक्यातील तापी पट्ट्यातील केळी बागा आडव्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. काढणीला आलेल्या केळी वादळामुळे खराब होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
पालकमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश-
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला दिले आहेत. येत्या दोन दिवसात नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असेही पालकमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.