जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ शहरातील रेल्वेच्या विभागीय कार्यालयात (डीआरएम ऑफिस) आज (सोमवारी) दुपारच्या सुमारास सीबीआयच्या पथकाने धाड टाकली. सूत्रांच्या माहितीनुसार, या कार्यालयातील वरिष्ठ अभियंत्यासह कार्यालयीन अधीक्षकाने मंजूर निविदांची वर्कऑर्डर देण्यासाठी ठेकेदाराकडून २ लाख ४० हजार रुपयांची लाच घेतल्याने सीबीआयच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांची उशिरापर्यंत कसून चौकशी केली जात होती. डीआरएम कार्यालयातील सिनियर डिव्हिजनल इंजिनिअर एम. एल. गुप्ता आणि मुख्य कार्यालयीन अधीक्षक संजीव राडे अशी सीबीआयने ताब्यात घेतलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांची नावे आहेत. या कारवाईचा संपूर्ण तपशील समोर आलेला नाही. मात्र, सीबीआयच्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सिनियर डिव्हिजनल इंजिनिअर एम. एल. गुप्ता आणि मुख्य कार्यालयीन अधीक्षक संजीव राडे या दोघांनी मलकापूर येथील एका कंपनीकडून मंजूर निविदांची वर्कऑर्डर देण्यासाठी २ लाख ४० हजार रुपयांची लाच घेतल्याचा संशय आहे. नागपूर सीबीआयकडे याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने नागपूर सीबीआयचे उपअधीक्षक एस. आर. चौगुले व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील पथकाने आज दुपारी डीआरएम कार्यालयात धाड टाकली.
एकाने घेतले २ लाख तर दुसऱ्याने ४० हजार
मिळालेल्या माहितीनुसार, मंजूर निविदांची वर्कऑर्डर देण्यासाठी मलकापूर येथील तक्रारदाराकडून एम. एल. गुप्ता याने २ लाख तर संजीव राडे याने ४० हजारांची लाच घेतली आहे. नागपूर सीबीआयकडे तक्रार आल्याने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी देखील झडती
सीबीआयच्या पथकाने डीआरएम कार्यालयात धाड टाकल्यानंतर गुप्ता व राडे यांना ताब्यात घेतले. तेथे दोघांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने रेल्वे क्वार्टर्समधील दोघांच्या राहत्या घरी देखील झडती घेतली. याठिकाणी चौकशीत काय घबाड मिळाले? याची माहिती होऊ शकली नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.
हेही वाचा - अनिल देशमुख प्रकरण : कोणतीही कारवाई नाही, याचा अर्थ तपासात स्थगिती नाही- सर्वोच्च न्यायालय