जळगाव - शहरातील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या(मविप्र) वादात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर नाईक तसेच इतरांवर रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील सामाजिक कार्यकर्ते अॅड. विजय भास्करराव पाटील यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी ८ डिसेंबर २०२० रोजी निंभोरा पोलीस ठाण्यात गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
मविप्र संस्थेत सन २०१५ मध्ये अॅड. विजय पाटील यांचे बंधू नरेंद्र भास्करराव पाटील यांच्या गटाने सहकार कायद्याने निवडणूक लढवून १८ सभासद निवडून आणले. तेव्हापासून संस्था पाटील गटाच्या ताब्यात होती. यानंतर भोईटे गटाने धर्मदायकडील नोंदणीचा आधार घेत संस्था आपल्याच ताब्यात असल्याचा दावा करुन त्या संदर्भात राज्य शासनाकडून मंजुरी आणली. यानंतर भोईटे गटाने पुन्हा एकदा संस्था ताब्यात घेतली होती. तेव्हापासून पाटील व भोईटे गटात वाद आहेत. याच वादातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हटले आहे तक्रारीत?
जानेवारी २०१८ मध्ये त्यांना निलेश भोईटे यांनी फोन करून संस्थेचे जुने रेकॉर्ड देण्याबाबत बोलणी केली. हे रेकॉर्ड तानाजी भोईटे यांच्याकडे असून ते सध्या पुण्यात आहेत. तुम्ही पुण्यात जाऊन त्यांची भेट घ्या व त्यांच्याकडून संस्थेचे जुने रेकॉर्ड स्वत:च्या ताब्यात घ्या, अशी बतावणी निलेश भोईटे यांनी केली. यावेळी अॅड. पाटील हे मोठे बंधु नरेंद्र पाटील यांच्याशी बोलून तीन-चार दिवसानंतर रेकॉर्ड घेण्यासाठी महेश आनंदा पाटील यांच्यासह कारने पुण्याला गेले. तानाजी भोईटे यांनी पाटील यांना कोथरुड परिसरातील हॉटेल किमया येथे बोलावले. या ठिकाणी तानाजी भोईटे, निलेश भोईट, शिवाजी भोईटे, विरेंद्र भोईटे, रामेश्वर नाईक हे थांबलेले होते. यावेळी तानाजी भोईटे यांनी 'सदरची संस्था गिरीश महाजन यांना हवी आहे, भाऊ एक कोटी रुपये देण्यास तयार आहेत' असा निरोप दिला. अॅड. पाटील यांनी नकार दिल्यानंतर रामेश्वर नाईक याने स्वत:च्या मोबाईलवरुन गिरीश महाजन यांना व्हिडिओ कॉल केला. 'तू सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन ही संस्था निलेश भोईटेच्या ताब्यात देऊन टाक, तुझा विषय संपवून टाक' असे महाजन यांनी व्हिडिओ कॉलवर अॅड. पाटील यांना सांगितले. ही बाब मान्य नसल्यामुळे अॅड. पाटील व महेश पाटील तेथून जाण्यासाठी निघाले असता भोईटे यांनी त्यांना थांबवले. नाराज होऊ नका तुम्हाला रेकॉर्ड देऊन टाकतो असे सांगून कारमध्ये बसवून त्यांना दुसऱ्या जागी नेण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावर जयवंत भोईटे, निळकंठ काटकर, गणेश कोळी उर्फ गणेश मेंबर, सुनील झंवर, विराज भोईटे हे देखील उभे होते. धावत्या कारमध्ये रामेश्वर नाईक याने अॅड. पाटील यांना चापट मारुन गळ्यावर चाकू लावून धाक दाखवला. सुनील झंवर याने देखील दम देऊन संस्था ताब्यात देण्याबाबत धमकावले. एमपीडीए लावू, अशी धमकी देत शिवीगाळ केली, अशा प्रकारची फिर्याद अॅड. पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आता तो गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे.
तीन वर्षे जुना विषय, आता तक्रार कशी?
अॅड. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही घटना जानेवारी २०१८ मध्ये म्हणजेच सुमारे तीन वर्षांपूर्वी घडलेली आहे. तसेच ही घटना पुण्यात घडली होती. अॅड. पाटील यांनी घटनेच्या तीन वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद का दिली? घटना घडल्याबरोबर पुण्यातच फिर्याद का दिली नाही? एवढा उशिरा का लावला? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात अॅड. पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, या प्रकरणाशी आपला काहीएक संबंध नाही. गलिच्छ राजकारणाचा हा प्रकार आहे. या गुन्ह्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गिरीश महाजन यांनी गुन्ह्याबाबत स्पष्टीकरण देताना केली.