जळगाव - 'वाढदिवस' हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी आपल्या चेहऱ्यावर आनंदाची लहर येते... एखाद्या कार्यक्रमाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते... सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा होतो. परंतु, जळगाव जिल्ह्यात एक गाव असे आहे, ज्याठिकाणी चक्क झाडांचा वाढदिवस साजरा केला जातो. विशेष म्हणजे, झाडांचा वाढदिवस साजरा करताना सेंद्रिय खतापासून तयार केलेला केकही कापला जातो. नंतर या केकचे तुकडे झाडांना खत म्हणून टाकले जातात. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हा नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबवला जात आहे.
जळगावमधील घुमावल गावात साजरा होतो झाडांचा वाढदिवस हेही वाचा - राष्ट्रीय आरोग्य मिशन : नियुक्त्यांमध्ये 400 कोटींचा गैरव्यवहार, फडणवीसांचा आरोप
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुक या गावात हा नाविन्यपूर्ण उपक्रम लोकसहभागातून राबवला जात आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपणाचे खूप महत्त्व आहे, हीच बाब लक्षात घेऊन घुमावलच्या ग्रामस्थांनी तीन वर्षांपूर्वी एकत्र येत वृक्षारोपणाची चळवळ सुरू केली. या चळवळीत हळूहळू ग्रामस्थांचा सहभाग वाढल्याने तिला व्यापक स्वरूप येऊ लागले आहे. ग्रामस्थांच्या एकीचे अन परिश्रमाचे फलित म्हणून, आजपर्यंत घुमावल गावाच्या आजूबाजूच्या क्षेत्रात गेल्या तीन वर्षांत सुमारे अडीच ते तीन हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही झाडे चांगली वाढली आहेत. या झाडांच्या तिसऱ्या वाढदिवसाचा कार्यक्रम नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला. घुमावल ग्रामस्थांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली. घुमावलच्या आदर्शवत उपक्रमाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. यावेळी डॉ. पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महिला व बाल ग्रामोद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने लोकसहभागातून हे उद्यान विकसित केले आहे. त्यात मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा अशी सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, युवकांसाठी ओपन जिम या संकल्पनेवर आधारित व्यायामाची साधने आहेत.
जळगावमधील घुमावल गावात साजरा होतो झाडांचा वाढदिवस हे तर एकीचे बळ...तीन वर्षांपूर्वी वसंतराव पाटील यांनी घुमावलचे लोकनियुक्त सरपंच म्हणून धुरा हाती घेतली. तेव्हापासून त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांना उपसरपंच प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, ईश्वर पाटील, तुकाराम पाटील, नितीन पाटील, विश्वास पाटील, भावलाल पाटील, वंदना पाटील, माणिक पाटील, गोरख पाटील तसेच ग्रामसेवक मनोहर पाटील आदींनी मोलाची साथ दिली. घुमावल हे आदर्श गाव व्हावे, म्हणून ग्रामस्थांनी परस्परातील मतभेद विसरून एक पाऊल पुढे टाकले. त्यामुळे शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे सोपे गेले. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी जल व मृद संधारणाच्या दृष्टीने विचार करून विविध उपाययोजना केल्या. गावात रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. वैयक्तिक शौचालयांचा वापर केला जातो. हळूहळू गावाचा कायापालट सुरू आहे.जळगावमधील घुमावल गावात साजरा होतो झाडांचा वाढदिवस काय आहे नेमकी संकल्पना- पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण अतिशय महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन ग्रामस्थांनी गावठाण जागेवर जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचे ठरवले. परंतु, नुसते वृक्ष लागवड करून चालणार नाही, तर त्यांचे संगोपन देखील झाले पाहिजे, या विचारातून एक भन्नाट कल्पना मांडण्यात आली. ती म्हणजे, गावातील प्रत्येक घराचे एक झाड असावे, त्या झाडाची देखभालीची जबाबदारी संबंधित घरातील सदस्यांनी करावी, असे ठरले. त्यानुसार प्रत्येक घराने आपल्या कुटुंबातील सदस्याच्या नावाने झाड लावले. कुणी मुलीच्या नावाने, कुणी मुलाच्या नावाने तर कुणी घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या नावाने झाड लावले. विशेष म्हणजे, दरवर्षी आपण आपल्या घरातील व्यक्तीचा वाढदिवस ज्याप्रमाणे साजरा करतो, त्याचप्रमाणे या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचीहे ठरले. प्रत्येक वाढदिवसाला सेंद्रिय खतापासून बनवलेला केक कापला जातो. अशा प्रकारे घुमावलच्या उजाड माळरानावर विविध प्रजातीची सुमारे अडीच ते तीन हजार झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे परिसर हिरवागार झाला आहे. घुमावलच्या ग्रामस्थांनी राबवलेली संकल्पना ही नाविन्यपूर्ण असून, ती इतर गावांसाठी आदर्श ठरणारी आहे.