जळगाव- ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ या जयघोषात टाळ, चिपळ्यांचा निनाद, अशा चैतन्यदायी वातावरणात शुक्रवारी जळगाव शहरातील पिंप्राळा उपनगरीतील आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सव पार पडला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री सुरेश जैन यांच्याहस्ते महाआरती झाली. त्यानंतर रथ ओढण्यास सुरुवात झाली.
जळगाव शहरातील पिंप्राळा उपनगरात आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी विठ्ठल मंदिर संस्थान आणि वाणी पंच मंडळाच्या वतीने रथोत्सव साजरा होतो. या लोकोत्सवाला सुमारे 144 वर्षांची परंपरा लाभली आहे. यावर्षी रथोत्सवाचे 145 वे वर्ष होते. पिंप्राळा येथे सकाळपासूनच रथोत्सवाचा उत्साह होता. पहाटेपासून रथ आणि उत्सवमूर्तीच्या विधीवत पूजेची तयारी सुरु होती. रथोत्सवामुळे भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
शुक्रवारी दुपारी दीड वाजता फुलांनी आकर्षक सजविलेल्या रथातील उत्सवमूर्तीची जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री सुरेश जैन यांच्याहस्ते महाआरती झाली. त्यानंतर रथ ओढण्यास सुरुवात झाली. यावेळी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमला होता. पिंप्राळ्यातील चावडीपासून रथोत्सवाला सुरुवात झाली. घराघरांतील गृहिणी रथाची आरती करीत होत्या. पंचक्रोशीतील भजनी मंडळे मोठ्या संख्येने रथोत्सवात सहभागी झाले होती. भजनी मंडळांच्या अभंगांनी अवघे वातावरण भक्तिमय झाले होते.
टाळ, मृदंगाचा गजर-
रथाच्या अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक मूर्ती असलेले वाहन होते. त्यापाठोपाठ भजनी मंडळे होती. भजनी मंडळांकडून टाळ, मृदुंगांचा गजर सुरू होता. भवानीची सोंगे देखील नृत्यात तल्लीन झाली होती. त्या पाठोपाठ विठुनामाच्या जयघोषात रथ ओढणारे भक्त व रथाला मोगरी लावणाऱ्या सेवेकऱ्यांची लगबग सुरु होती. रथात विराजमान राधा-कृष्ण तसेच विठ्ठलाच्या स्वयंभू मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. रथाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना श्रीफळ तसेच गुळ, धणे, सुंठ मिश्रीत पंजार, केळीचा प्रसाद दिला जात होता.
गिरीश महाजनांकडून आठवणींना उजाळा-
रथोत्सवासाठी आलेल्या भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना गिरीश महाजन यांनी गेल्या वर्षी पंढरपूरला केलेल्या विठ्ठलाच्या पूजेच्या आठवणींना उजाळा दिला. आता कायद्याच्या चौकटीत राहून सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील आज आरक्षणाला स्थगिती न दिल्याने सरकारला दिलासा मिळाल्याचे ते म्हणाले.