जळगाव - जिल्ह्यात आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या जलसाठ्यातही १० ते १२ टक्के वाढ झाली आहे. शहराचा पाणीपुरवठा ३ ऐवजी २ दिवसाआड करण्याचा प्रस्ताव नगरसेवकांनी प्रशासनाला दिला आहे. मात्र, वाघूर धरणामध्ये अजूनही पुरेसा जलसाठा नसल्याचे सांगत प्रशासन 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे.
मागील वर्षी जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यानंतर यावर्षी पाऊस देखील दीड महिना उशिराने दाखल झाला. त्यामुळे जळगावकरांवर जलसंकट निर्माण झाले होते. २ महिन्यांपूर्वी वाघूर धरणाचा जलसाठा ८ टक्क्यांवर आल्याने महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा एप्रिल महिन्यापासून ३ दिवसाआड केला होता. जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनीही विरोध दर्शविला नव्हता. मात्र, आता जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. विशेषतः वाघूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या जामनेर तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा २० ते २२ टक्क्यांवर गेला आहे. पाऊस सुरूच असल्याने जलसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणीपुरवठा ३ ऐवजी २ दिवसाआड करावा, अशी मागणी केली जात आहे.