जळगाव - उद्योगपती राज कुंद्रा याच्या विरुद्ध थेट पुरावा नाही, परंतु त्याचे नाव पुराव्यांच्या साखळीत आहे. जर तपास यंत्रणेने राज कुंद्राच्या नावाचा सहभाग योग्य पद्धतीने या प्रकरणाशी जोडला तर तो त्याच्याविरुद्ध ठोस पुरावा ठरू शकतो. या प्रकरणी तपास सुरू आहे, त्यामुळे अधिक बोलणे संयुक्तिक होणार नाही, असे मत राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.
हेही वाचा - आता एकनाथ खडसेंच्या पत्नीही ईडीच्या रडारवर; जाणून घ्या मंदाकिनी खडसेंचा राजकीय प्रवास
अश्लील चित्रपट बनवण्यासाठी आणि ते चित्रपट अॅपवरून प्रवाहित केल्याप्रकरणी हिंदी चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती तथा उद्योगपती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. कुंद्रा याच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या कारवाईची पुढची दिशा कशी असेल, याबाबत उत्सुकता आहे. याच विषयाबाबत उज्ज्वल निकम यांनी मत मांडले.
पोर्नोग्राफी प्रकरणात अडकला आहे कुंद्रा
राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअॅपवर झालेल्या संभाषणावरून असे दिसून आले आहे की, या प्रकरणात कुंद्रादेखील आर्थिक व्यवहारात सामील होता. मॉडेल, तसेच अभिनेत्रींच्या असहाय परिस्थितीचा फायदा घेत त्याने त्यांना अश्लील चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडले, असा कुंद्रा याच्यावर आरोप असल्याचे निकम म्हणाले.
..तर वाढतील कुंद्राच्या अडचणी
यावेळी कुंद्राला काय शिक्षा होईल, याबद्दल आताच काही सांगणे कठीण आहे. कारण हे प्रकरण अद्याप तपासणीच्या टप्प्यावर आहे. पुढे कागदोपत्री पुरावे असतील, त्या आधारे तपास यंत्रणेकडून कोणते दावे केले जातात, हे सर्व त्याच्यावर अवलंबून असेल. तपास यंत्रणेने राज कुंद्राच्या नावाचा सहभाग योग्य पद्धतीने या प्रकरणाशी जोडला तर त्याच्या अडचणी वाढू शकतात, असेही उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
हेही वाचा - जळगावच्या युवा शेतकऱ्याने कारल्याची शेती करत शोधला उत्पन्नाचा मार्ग