जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गुरुवारी जिल्ह्यात पुन्हा 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांचा आकडा हा 90 वर पोहोचला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगावसह भुसावळ आणि पाचोरा येथील रहिवासी असलेल्यांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव जिल्हा रुग्णालयासह इतर तालुक्यातील कोव्हिड रुग्णालयांमध्ये कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. स्वॅब घेतलेल्या 46 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले आहेत. यापैकी 41 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 5 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक 60 वर्षीय पुरुष, जळगावातील कांचननगरातील 35 वर्षीय महिला, तर पाचोरा येथील 44 व 53 वर्षीय पुरूष आणि 20 वर्षीय महिला अशा 3 व्यक्तींचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींमध्ये पाचोरा येथील 19 व्यक्तींचा समावेश आहे.
मृतांची संख्या झाली 14 -
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 90 इतकी झाली असून, त्यापैकी 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमळनेर शहरातील कोरोनाबाधित असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.