जळगाव - जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असताना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे डेंग्यूचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजेच, जून ते ऑगस्ट या 3 महिन्यांच्या कालावधीत ठिकठिकाणी डेंग्यूच्या 26 रुग्णांची नोंद झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे, जळगाव महापालिका हद्दीत डेंग्यू वेगाने हातपाय पसरत आहे. जळगावात तब्बल 16 हजारांपेक्षा अधिक घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. शहरासह जिल्ह्यात थंडी-तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असून, सरकारी व खासगी दवाखाने रुग्णांच्या गर्दीने फुल्ल आहेत.
जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जणांना डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा आरोग्य यंत्रणेसह तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जळगाव शहरात डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक घरोघरी जाऊन अबेटींग तसेच फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
आतापर्यंत आढळले डेंग्यूचे 33 रुग्ण
जिल्हा हिवताप अधिकारी अर्चना पाटील यांनी या विषयासंबंधी 'ईटीव्ही भारत'ला माहिती देताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांच्या कालावधीत डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षणे असलेल्या 127 संशयित रुग्णांचे नमुने मलेरिया विभागाकडून घेण्यात आलेले होते. त्यात 33 रुग्णांचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर म्हणजेच जून महिन्यापासून डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याचे चित्र आहे. जून महिन्यात 12 तर जुलैत 3, तर ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 11 रुग्ण आढळले आहेत. एकट्या जळगाव शहरात ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे 5 रुग्ण आढळले आहेत, असेही अर्चना पाटील म्हणाल्या.
जळगाव शहरात 16 हजार 625 घरांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या
डेंग्यूची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने जळगाव शहरात महापालिका प्रशासनाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. त्यात आतापर्यंत 53 हजार 207 घरांची तपासणी केली असून, त्यातील 16 हजार 625 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. महापालिका प्रशासनाच्या मलेरिया विभागाच्या पथकाने घरोघरी सुमारे 1 लाख 91 हजार 520 कंटेनर तपासले आहेत. त्यातील 16 हजार 913 कंटेनर दूषित असल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य विभागाने 21 हजार 280 भांडे अबेटिंग केले आहेत, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. दरम्यान, जळगाव शहरात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने घाण होत आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून नियमित स्वच्छता होत नसल्याने साथीचे आजार बळावले आहेत. डेंग्यूचा उद्रेक झाला असून महापालिकेने फवारणी, अबेटिंग करायला हवी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
...अन्यथा महापालिका प्रशासन कारवाई करणार - महापौर जयश्री महाजन
डेंग्यूचा उद्रेक झाल्याने खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाकडून काळजी घेण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. घरोघरी जाऊन प्रबोधनपर पत्रके वाटली जात आहेत. मात्र, तरीही काही नागरिकांना याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. म्हणून आता पुढील सर्वेक्षणादरम्यान ज्या घरांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून येतील, अशा घराच्या मालकांवर दंड करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये, अडगळीतील जुने भांडे, टायर, कुलरमध्ये पाणी नसेल, याची खात्री करावी. आठवड्यातून किमान एकदा कोरडा दिवस पाळावा. पाण्याच्या टाक्या झाकण लावून बंद कराव्यात, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.
हेही वाचा - दिलासादायक! जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही