जळगाव: शहरात काही दिवसापासून चोरीचे सत्र सुरूच आहे. शहरातील कालिंका माता चौक परिसरात असलेल्या स्टेट बँक शाखेत दोन शस्त्रधारी दरोडेखोरांनी प्रवेश करत, बँक व्यवस्थापकावर धारदार शस्त्राने वार करून सुमारे 15 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, यांच्यासह एमआयडीसी पोलीस दाखल झाले आहेत. तर श्वान पथक व तसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे.
दोघांनी चाकूचा धाक दाखवत दरोडा: शहरात गत काही दिवसापासून चोरीचे सत्र सुरु असून सर्वात जास्त चोरीचे प्रमाण बँक परिसरात वाढले आहे. घरफोडी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरी ही तर नित्याची बाब बनली आहे. जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत हा दरोडा पडला. दोघांनी चाकूचा धाक दाखवत भरदिवसा दरोडा टाकून रोकड लांबवली. चोरट्यांनी बँकेतील अंदाजे 15 लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ: दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेतली. जखमी झालेल्या व्यवस्थापकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसीचे प्रभारी शंकर शेळके यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याशिवाय श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून आरोपींचा शोध सुरु आहे. परंतु भरदिवसा घडलेल्या या दरोड्यामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही असे दिसत आहे. तसेच दिवसाढवळ्या होत असलेले गुन्हे पाहता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा -