जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अट्रावल गावात एका पुतळ्याची अज्ञातांनी तोडफोड केली. या कारणामुळे दोन गटांमध्ये हाणामारी झाली, असे जळगावचे एसपी एम राजकुमार यांनी शनिवारी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. 12 जणांना ताब्यात घेतले. पुढील कारवाई सुरू आहे, असे जळगावचे एसपी म्हणाले. यापूर्वी 28 मार्च रोजी नमाज पढताना मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकरणी 56 जणांना अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.
संगीत वाजवण्यावरून वाद : दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. सध्या परिसरात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे, असे जळगावच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले. मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून वाद झाला आणि त्यातून दगडफेक झाली आणि त्यामुळे दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली, असे पोलिसांनी सांगितले. जळगावहून नाशिक जिल्ह्यातील वणीकडे निघालेली दिंडी पालधी गावातून जात असताना ही घटना घडली.
पुतळ्याची विटंबनेची घटना : पोलिसांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. सध्या पूर्ववत स्थिती झाली आहे. दंगल आणि सरकारी अधिकार्यांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अनुक्रमे दोन खटले दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी अट्रावल येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता. त्यावर बसण्यावरून वाद झाला होता. हा वाद शनिवारी सकाळी पुन्हा उफाळून आला होता. त्यावेळी पुतळ्याची विटंबनेची घटना घडली. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी केले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल : छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील रामनवमीच्या आदल्या रात्री दोन गटात राडा झाला. किराडपुरा परिसरात यावेळी दंगलखोरांनी अनेक वाहने जाळली होती. दंगलीत लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली होती. त्यानंतर राम मंदिराबाहेर डझनभर वाहने जाळली. प्रचंड तोडफोड झाली. परिसरात तणाव पसरला होता. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दंगलखोरांवर कडक कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिले होते.