हिंगोली - वसमत तालुक्यातील कळंबा पाटीजवळ सोमवारी एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळले. त्यामुळे त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर 24 तासात या खुनाचा उलगडा झाला आहे. एकतर्फी प्रेमातून तीन मित्रांनी मिळून आपल्या मित्राची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्ञानेश्वर शिवाजी चव्हाण असे मृत तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर दोन दिवसांपासून बेपत्ता होता. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नोंद झाली होती.
एकतर्फी प्रेमातून केली हत्या
ज्ञानेश्वर हा एका तरुणाशी फोनवर सतत बोलायचा. त्याचा मित्र प्रमोद याचे त्या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. ज्ञानेश्वर तिच्याशी फोनवर बोलतो हे कळल्यावर प्रमोदच्या मनात राग निर्माण झाला होता. त्याने अनेकवेळा ज्ञानेश्वरला याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे फोनवर बोलणे सुरुच होते. त्यामुळे प्रमोदचा राग अनावर होऊन त्याने ज्ञानेश्वरचा काटा काढायचे ठरवले. त्याने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने ज्ञानेश्वरचा खून केला. त्याच्या डोक्यात शस्त्राने वार करुन त्याचा मृतदेह कळंबा पाटीजवळच्या शेतात फेकून दिला. तसेच संशय येऊ नये म्हणून त्याची दुचाकी एका पुलाखाली फेकून दिली.
त्यानंतर पोलिसांनी प्रमोद आप्पासाहेब खाडे, विनोद भीमराव कापुरे आणि प्रवीण लक्ष्मण अंभोरे या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांची कसून चोकशी केली. त्यावेळी प्रमोदने खून केल्याचे कबूल केले.
हेही वाचा - सत्तास्थापनेचा मुहूर्त नाही; पण हे सरकार पडल्यावर सक्षम पर्याय देऊ - देवेंद्र फडणवीस