हिंगोली - जिल्ह्यातील चिंचोली महादेव येथे दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. येथील गावकरी पहाटे चहा घेण्याऐवजी दारूचे घोट घेत आहेत. दारूड्या पतीमुळे एका महिलेला मुलाच्या मेसच्या डब्ब्याचे पैसे देण्यासाठी मंगळसूत्र विकावे लागल्याची घटना समोर आली आहे. जईबाई राजकुमार वाढवे असे मंगळसूत्र विकलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला प्रशासनास निवेदन देण्यासाठी आली असता दारू मुळे स्वतः वर होणारा अन्याय हुंदके देत सांगत होती.
या दारूचा शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम होऊन गावाचीही शांतता भंग होत आहे. एवढेच नव्हे तर हे तळीराम दारूच्या एवढे आहारी गेले आहेत की ते दारूच्या व्यसनामुळे घरातील भांडी विकत आहेत. महिलांनी घरात ठेवलेल्या डाळीसुद्या विकून दारूचे व्यसन पूर्ण करत आहेत. या प्रकाराने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. चिंचोली महादेव येथे अवैध दारू विक्रीची दोन दुकाने आहेत. त्यामुळे या ठिकाणी नियमित दारूचा महापूर वाहत आहे.
दारूची तलफ पूर्ण करण्यासाठी हे तळीराम मजुरी करून पैसे कमवणाऱ्या घरच्या महिलांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे घेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची व्यथा या महिलेने सांगितली. तसेच दारूडया नवऱ्याच्या त्रासासा कंटाळून अनेक महिला आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेल्या आहेत. तर बऱ्याच महिला आजही आपल्या दारुड्या पतीचा मार सहन करत आहेत. अनेकदा दारू बंदीची मागणी केली मात्र काहीही उपयोग झालेला नाही. दारू विक्रत्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर तो महिलांना धमकी देत असल्याचे महिला सांगत होत्या.
दारू बंदीचे निवेदन देण्यासाठी आलेल्या अनेक महिलांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. डोळे पुसत दारू मुळे कशी उपाशी राहण्याची वेळ येत आहे, याची परिस्थिती त्या सांगत होत्या. एकीकडे पोलीस प्रशासन दारू विक्रीवर छापे मारल्याचे मोठा आव आणून सांगत आहे. तर दुसरीकडे आजही काही गावांमध्ये दारूचा महापूर वाहत आहे. गाव तेथे दारू अशी गत झाली आहे. महिलांनी अश्रू ढाळल्यानंतर तरी प्रशासन चिंचोली महादेव येथील दारू बंदीसाठी ठोस कारवाई करेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.