हिंगोली - गेल्या ४ ते ५ दिवसापासून जिल्ह्याचे तापमान ४१ ते ४२ अंशावर गेले आहे. त्यामुळे नेहमीच गर्दीने फुलून जाणाऱ्या रस्त्यावर आज शुकशुकाट पाहायला मिळाला. तसेच या वाढत्या तापमानामुळे शीतपेयांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे हिंगोली मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. १८ एप्रिलला निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय वातावरण थंड झाले. मात्र, जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा कायमच राहिला. त्यामुळे नागरिक उष्ण तापमानात बाहेर पडण्याचे टाळत आहेत.
जिल्ह्यातील बाजारपेठेत वाढत्या तापमानापासून बचाव करणारे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. तसेच वाढत्या तापमानामुळे शीतपेयांच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा फायदा हा शीतपेय चालकांना होत आहे. जिल्ह्यात जागो-जागी रस्त्याकडेला शीतपेयाची दुकाने थाटलेली आहेत.
जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली
एका बाजूला उन्हाचा पारा वाढला असतानाच अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही गावांमध्ये तर एक हातपंप आणि एकच विहीर असल्यामुळे दुष्काळाचे भयंकर चित्र दिसून येत आहे. तर सेनगाव परिसरासह जिल्ह्यातील १७ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून टँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ होताना दिसत आहे.