हिंगोली- मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. यातून लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळवित आहेत. जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकाला बगल देऊन तीन वर्षांपासून ड्रॅगन फ्रुटची शेती करण्यास सुरुवात केली. हा प्रयोग यशस्वी झाला असून यातून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावले आहे. जिल्हाभरात या शेतकऱ्याची प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख झाली आहे.
रमेश जाधव (गोंधनखेडा ता. सेनगाव) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव यांच्याकडे आठ एकर शेती आहे. मात्र, दरवर्षी तेच-ते पारंपरिक पिके घेऊन शेतामध्ये काहीच उत्पन्न निघत नव्हते. जाधव काहीतरी वेगळी शेती करण्याच्या शोधामध्ये होते. दरम्यान, जाधव यांनी औरंगाबादमध्ये रमेश पोखरणा यांच्या शेतात ड्रॅगन फ्रुटची शेती पाहिली. त्यावेळी आपण पण अशी शेती करायची असे जाधव यांनी ठरविले.
जाधव यांनी शेतात ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची लागवड केली. या रोपट्यांना केवळ 40 अंश सेल्सियस तापमान लागते. त्यामुळे त्यांनी यावरही पर्याय निवडत शेवगाची लागवड केली. शेवगा झाडाच्या सावलीखाली एका खांबावर चार असे 520 खांब उभे केले. त्यावर 2 हजार 100 ड्रॅगन फ्रुट झाडाची लावगड केली. वर्षभरातच ड्रॅगन फ्रुट आणि शेवगाही चांगला बहरात आला. यातून जाधव यांना दुहेरी उत्पन्न सुरू झाले.
शेवग्याला हिंगोली येथे बाजारपेठ उपलब्ध आहे. मात्र, ड्रॅगन फ्रुटला हिंगोलीत नव्हे तर नांदेड, जालना, औरंगाबाद येथे मार्केट उपलब्ध आहे. ड्रॅगन फ्रुटला प्रतिकिलो 150 रुपये भाव मिळतो. हे फळ बिपी, शुगर, दमा अशा अनेक आजारावर गुणकारी औषध म्हणून उपयोगी ठरते. ड्रॅगन फ्रुटच्या झाडांना केवळ सेंद्रिय खतच दिले जाते. त्यामुळे हे फळ मानवी जीवनाच्या आरोग्यावर अजिबात दुष्परिणाम होत नाही. या फळाला खूप मागणी आहे. त्या तुलनेत याचे उत्पन्न होत नाही. आवक कमी असल्याने, बाजारात या पिकाला चांगला भावही मिळतो.
कोरोनामुळे काही प्रमाणात फळ विक्री करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र, पुढील वर्षी हे फळ देशाबाहेर पण निर्यात करणार असल्याचे शेतकरी जाधव यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी सुरुवातीला पारंपरिक पिकाबरोबर ड्रॅगन फ्रुट शेती करावी आणि यातून जेव्हा उत्पन्न चांगल्याप्रकारे मिळण्यास सुरुवात होईल तेव्हा हळूहळू पारंपरिक शेतीला बदल देत हीच शेती करावी, असे आवाहन जाधव यांनी केले.