हिंगोली - जिल्ह्यात आठवडाभरात एका पाठोपाठ 5 अपघाताच्या घटना घडल्या आहेत. हिंगोली येथील राज्य राखीव दलात कार्यरत असलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अमरावती येथे कार्यरत असलेल्या जवानाचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. नांदेड येथे आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी जाताना ट्रक अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. लागोपाठ अपघाताची मालिका सुरू असल्याने वाहन चालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणपत बाबुराव राठोड असे मृत जवानाचे नाव आहे. हा जवान हा हिंगोली येथील राज्य राखीव दलामध्ये कार्यरत होता. तो नागपंचमीनिमित्त औंढा नागनाथ तालुक्यातील आपल्या मूळगावी काठोडा तांडा येथे कुटुंबीयांना भेटण्यासाठी आला होता. मात्र, कुटुंबीयांना भेटून परत हिंगोलीकडे जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. हिंगोली औंढा मार्गावर परळीकडे जाणाऱ्या एका दुचाकीची आणि जवानाच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमी जवानाला शासकीय रुग्णालयात हलविले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी अजून तरी कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही.