हिंगोली - जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत प्रशासन पाणीटंचाई निवारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात ४६ च्यावर टँकरची संख्या पोहोचली असून, अजूनही पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळही पाणीटंचाई निवारणासाठी सरसावले आहे. परिवहन मंडळामार्फत हिंगोली जिल्ह्यातील हिवरा बेल दत्तक घेतले असून तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे.
हिंगोली जिल्हा हा पाणीटंचाईने होरपळून निघत आहे. बर्याच गावात एका एका हंड्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 39 गावांची तर चक्क टँकरवरच तहान अवलंबून आहे. टंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज असून, मागेल त्या गावाला टँकर अधिग्रहण करून पाणी टंचाईवर निवारण करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तरी देखील बरीच गावे तहानलेली आहेत. हिंगोली जिल्ह्यात या वर्षी पहिल्यांदाच एवढी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी देखील पहिल्यांदाच एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे.
महामंडळातर्फे हिंगोली जिल्ह्यातील हिवरा बेल हे गाव बाळासाहेब ठाकरे अपघात साहाय्यता निधी अंतर्गत स्थापन झालेल्या न्यासामार्फत गाव दत्तक घेतले आहे. टायर कधी स्पेअर पार्ट घेऊन नेहमीच धावणारी लाल परी आता पहिल्यांदाच पाणी घेऊन धावणार आहे.
एसटी महामंडळाच्या या पुढाकाराने पाणीटंचाईवर मात होईल हे खरे, मात्र महामंडळाने हिवरा बेल या गावाचीच का निवड केली? हा देखील एक शोधाचा विषय आहे. मात्र, पाणीटंचाई असल्याने काही का होईना या गावाची निवड केल्याबद्दल एसटी महामंडळाच्या या पुढाकाराने समाधान व्यक्त होत आहे. एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक राजेंद्र जंवजाळ यांच्याहस्ते हिवरा बेल गावात टँकरचे पाणी सोडण्यात आले. गावात पाण्यासाठी भटकंती करण्याऱ्या ग्रामस्थांना लालपरी गावात टँकर घेऊन येताना दिसताच ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.