हिंगोली - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. तर कापून टाकलेले सोयाबीन बऱ्याच भागात पाण्यावर तरंगत आहे. त्यातच रविवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे उरले सुरले सोयाबीनही वाया गेले. तर कपाशीच्या पिकाला देखील मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा... अमरावतीत परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल; सोयाबीनला फुटली कोंब, कापूस बोंडे सडण्याचा मार्गावर
हिंगोली जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. रात्रीच्या सुमारास तर पावसाचा वेग वाढला होता. सलग पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झेंडूच्या फुलासह सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. सेनगावसह जिल्ह्यातील इतर भागातही कापून टाकलेले सोयाबीन वाहून गेले आहे. सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीच्या दिवसातच शेतातील धान्याचे नुकसान झाल्याने यंदाची दिवाळी ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच कडू बनली आहे.
हेही वाचा... 'तहसिल कार्यालयातील क्लर्क ते दिंडोरीचे आमदार' नरहरी झिरवाळ यांचा प्रेरणादायी प्रवास
परिसरात पावसाचे प्रमाण होते की, प्रत्येक शेतात मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याचे दिसून येत आहे. मात्र एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील एकाही प्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी देखील केलेली नाही. शेतकऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.