हिंगोली - पोलीस उपविभागीय अधिकारी ए. जी. खान यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगरला अटक केली आहे. ओंढा नागनाथ येथे बांगर यांनी २९ नोव्हेंबरला शिवसेनेतर्फे काढलेल्या मोर्चात कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष टारफे यांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे टारफे यांनी ओंढा नागनाथ पोलीस ठाण्यात ४ डिसेंबरला जातिवाचक शिवीगाळ दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आमदार टारफेंना शिवीगाळ करणे, संतोष बांगरला चांगलेच महागात पडले आहे.
बांगर यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून विलंब केला जात होता. त्यामुळे टारफे यांनी अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक आयोगाचे अध्यक्ष न्या. सी. ए. थुल यांची भेट घेऊन बांगर यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानुसार आज बांगर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.
नागनाथ औंढा येथे २९ नोव्हेंबरला शिवसेनेतर्फे औंढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी संतोष बांगर यांनी शिवसेना स्टाईलमध्ये संतोष टारफे यांच्यावर सडकून टीका केली होती. एवढेच नव्हे तर टारफे यांच्यावर वैयक्तिक टीका करत टारफे यांना श्वानाची देखील उपमा देऊन अपमानित केले होते. त्यानुसार टारफे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बांगर यांना आज अटक करण्यात आली.