हिंगोली - शहरातील अष्टविनायक नगर भागातील ७ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हिंगोली सत्र न्यायालयाने आरोपीस १० वर्षांचा सश्रम कारावास व तीस हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाच्या या निकालाने पीडितेच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, या निकालाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हिंगोली शहरातील अष्टविनायक नगर भागात २९ डिसेंबर २०१७ ला सकाळी दहा ते पावणे अकराच्या सुमारास आरोपी रघुनाथ वाघमारे याने त्यांच्याच जवळच्या नात्यातील ७ वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण केले. ही घटना पीडित मुलीच्या वडिलांनी प्रत्यक्ष पाहिली. संतप्त पीडितेच्या वडिलांनी शहर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सपोनि ज्ञानेश्वर मुलगिर यांच्याकडे होता. त्यांनी प्रकरणाचा तपास करून हिंगोली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आज याप्रकरणी सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निकाल दिला.
न्यायालयाने आरोपीला १० वर्षाचा सश्रम कारावास ३० हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास ३ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात पीडित मुलीचे वडील फिर्यादी होते. न्यायालयात साक्षीपुराव्या दरम्यान पीडित मुलीचे वडील स्वतः पीडित मुलगी तिची आई हे फितुर झाले. त्यामुळे सरकारी पक्षाला आरोपीला शिक्षा होण्यासाठी कसरत करावी लागली. प्रमुख साक्षीदार फितूर झाल्याने सरकारी पक्षाला घटनास्थळावरील पंच आणि पीडित मुलीचा घटनास्थळावरील व्हिडिओ रेकॉर्डिंग जबाब, वैद्यकीय चाचणी, या बाबी महत्त्वाच्या ठरल्या.
विषेश म्हणजे न्यायालयांनी फितूर साक्षीदार राहुल वामनराव भोंगे याने खोटी साक्ष दिल्याने त्याच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये म्हणून, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३४४ नुसार नोटीस काढली आहे. न्यायालयाच्या या निकालाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सरकारी पक्षातर्फे एन.एस. मुटकुळे यांनी खटल्याचे काम पाहिले.