हिंगोली - यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झालेले आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण भागात तीन ते चार किमी पायपीट करावी लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्या शेतकऱ्यांना यावर्षीची 30 एप्रिलपर्यंतची देयके देण्याची सूचना पालक सचिव नितीन गद्रे यांनी प्रशासनाला दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अधिग्रहणाची संख्या 353 वर जाऊन पोहोचली आहे. तर टँकर 50 च्यावर सुरू आहेत. अजून टँकर अन् अधिग्रहण प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे जूनपर्यंत दोन्हीही संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर आलेले पालक सचिव गद्रे यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील पाणीटंचाईचा आढावा घेतला. ग्रामस्थांसोबत संवाद साधून त्यांच्या पाण्यासंदर्भात अडीअडचणी जाणून घेतल्या. टँकर वेळेवर येतो किंवा नाही, टँकरमध्ये ब्लिचिंग पावडर असते, की नाही, याची शहानिशा त्यांनी ग्रामस्थांकडून केली. एवढेच नव्हे, तर गद्रे यांनी अधिग्रहण केलेल्या विहिरीवर धाव घेत पाणी पातळीचा आढावा घेतला. इतर जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी बोगस अधिग्रहण तसेच अधिग्रहण केलेल्या विहिरींची पाणीपातळी पूर्णता खालावल्याचे धक्कादायक चित्र समोर आलेले आहे. हा प्रकार हिंगोलीत तर होत नसेल ना, याची पालक सचिव गद्रे यांनी बारकाईने तपासणी केली. विशेष म्हणजे रामवाडी येथे पाणी फाऊंडेशन अंतर्गत सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत मोठ्या पोटतिडकीने सहभागी झालेल्या ग्रामस्थांचे गद्रे यांनी कौतुक केले.
ग्रामस्थांच्या या श्रमदानामुळे यावर्षी तब्बल दोन कोटी लिटर पाणीसाठा निर्माण होऊन, दोन हजार टँकर पाणी उपलब्ध होणार असल्याची महितीही त्यांनी दिली. मात्र मग्रारोहयो योजना शेतकऱ्यांच्या उपयोगाची असली, तरीही या योजनेतून केवळ विहिरींची कामे उरकली जात आहेत. त्यामुळे गद्रे यांनी नाराजी व्यक्त केली. याच योजनेतून नाला, बांध गाळ काढण्याची कामे, तलाव खोदकामे, इतरही कामे राबवून मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. तर शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाची माहिती ताबडतोब सादर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यात दोन दिवस मुक्काम करून पालकमंत्र्यांनी दिलेले मोजकेच आदेश हिंगोली प्रशासनाने पाळले आहेत. अजूनही हिंगोली जिल्ह्यातील शिवनी बुद्रुक येथे शुद्ध पाण्याचे टँकर पोहोचलेले नाही. कळमनुरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी नगर परिषदेला शिवणी येथे शुद्ध पाणी देण्याचे आदेशित केले आहे. मात्र अजून तरी कोणत्याही हालचाली प्रशासनस्तरावर झालेल्या नाहीत. त्यामुळे आता हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालक सचिवांचे आदेश प्रशासन कितपत पाळते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सिरसम खुर्द, पेडगाव वाडी, कनका, कोंढूर, हातमाली व उमरखोजा या गावाला पालक सचिव गद्रे यांनी भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. सध्यस्थितीत पाण्याची उपलब्धता तसेच टँकर, अधिग्रहण केलेल्या बोअर, विहिरींची त्यांनी माहिती घेतली. यावेळी सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.