हिंगोली - जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने नेहमीच आगळे वेगळे आंदोलन केले जातात. यावेळीस पक्षाच्यावतीने प्रशासनास अतिशय खालचा दर्जा देत रेशनचा काळा बाजार न थांबवू शकल्याने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर 'गाढव बांधो' आंदोलन केले जाणार आहे. हे जरी खरे असले तरी सध्याच्या परिस्थितीत गाढव शोधणे आंदोलकांना फारच कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऐन लग्नसराईत घोड्यापेक्षा गाढवालाच जास्ती मान असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून गाढव शोधत आंदोलकांना फिरावे लागत असल्याचे चित्र आहे. हे आगळे वेगळे आंदोलन पाहण्यासाठी सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. सकाळपासून पायपीट करूनही दुपारपर्यंत एकही गाढव सापडत नव्हते.
जिल्ह्यात रेशनचा एवढा काळा बाजार वाढलाय की, कोण चोर अन कोण अधिकारी हेच कळायला मार्ग नाही. जिल्हा तर रेशनच्या बाबतीत एवढा गाजलाय, की वाटप क्विंटलने तर चोरी मॅट्रिक टनाने होत आहे. त्यातच रेशन दुकानदाराने देखील लाभार्थ्यांना रेशन वाटपावरून चांगलेच वेठीस धरले आहे. त्यामुळे प्रशासनाकडे तक्रारीचा पाऊस होत असला तरी प्रशासन दखलच घेत नाही. यामुळेच प्रहार जनशक्ती पक्षाचे विजय राऊत नेहमीच वेगवेगळे आंदोलन करून प्रशासनाचे जिल्ह्यातील रेशनच्या काळ्या बाजारासह इतर प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज तर चक्क गाढव बांधो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे आंदोलक गाढव शोधण्यासाठी सैरावैरा भटकत होते, तर दाताडा, ताकतोडा, कहाकर, गोरेगाव, वरखेडा या गावातील रेशन लाभार्थी जिल्हाधिकारी परिसरात येऊन आंदोलकांची प्रतीक्षा करत बसले होते.
सद्या भीषण पाणी व चारा टंचाई असल्याने, गुरे सांभाळणे कठीण झाले आहे, तर गाढव कुठे? असा प्रश्न आंदोलनकर्त्यांना केला जात आहे. विशेष म्हणजे ज्या गावचे ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते, ते देखील गाढवाचा शोध घेत होते. रेशन तर मिळेनात मात्र गाढवही मिळाना अशी स्थिती आहे. आंदोनलनासाठी गाढव जरी उशिरापर्यंत मिळाले नसले तरी या आंदोलनाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.