हिंगोली - पोलीस म्हटले की आपल्या मनात आदरयुक्त भीती निर्माण होते. पोलीस कठोरच असतात असा आपला सर्वसाधारण समज असतो. पण, या समजाला छेद देणारी घटना हिंगोलीत घडली. एका शासकीय कार्यालयासमोर रडणाऱ्या लहानग्याला बिस्कीट पुडा देणारा पोलीस कर्मचारी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
हिंगोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आजी तिच्या छोट्या नातवाला घेऊन बसली होती. त्याची आई आधारकार्डच्या कामासाठी कार्यालयात गेली होती. पण, खूप वेळ झाला तरी ती न परतल्याने लहान मुलगा रडायला लागला. आजीच्या समजावण्यानंतरही तो रडतच होता. आजूबाजूचे लोक त्याचे रडणे पाहत होते. पण, सगळे आपापल्या कामात असल्याने त्याच्याकडे पाहण्यास कुणाला वेळ नव्हता.
तिथेच कर्तव्यावर असणाऱ्या शेख या पोलीस कर्मचाऱ्याला तो मुलगा रडताना दिसला. त्यांनी जवळ जाऊन त्याच्या आजीची विचारपूस केली. काही मदत हवी का विचारले. शेख जोपर्यंत होते तोपर्यंत मुलगा रडायचा थांबला. पण, ते परतताच त्याने परत रडायला सुरुवात केली.
थोड्याच वेळात पोलीस कर्मचारी शेख हातात एक बिस्कीटचा पुडा घेऊन आले. पुडा हातात येताच चिमुरड्याचा चेहरा खुलला आणि त्याने रडणे थांबले. पोलिसाच्या या कृतीने आजूबाजूचे लोकही विस्मयचकित झाले. पोलिसांविषयी असणाऱ्या त्यांच्या मनातील पूर्वग्रहाला या घटनेमुळे छेद गेला होता. उपस्थितांपैकी अनेकांनी या प्रसंगाला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले.