हिंगोली - अगोदरच हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने पूर्णपणे होरपळून निघाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी पैशाची जुळवाजुळव करून, डोक्यावरील कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तलाठी त्यांना त्रास देत असल्याचे चित्र आहे. गिरगावात अशाच एका तलाठ्याने चार्ज स्वीकारला आणि दुसऱ्याच दिवशी २ हजाराची लाच घेताना त्याला पकडण्यात आले. एका शेतकऱ्याच्या सातबारावर झाडांची नोंद करून घेण्यासाठी अन् कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
संजय संभाराव धाडवे असे अटक झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. तलाठ्याने तक्रारदाराच्या आई-वडिलांच्या नावावरील सातबारावर बँकेचा कर्जाचा बोजा कमी करून, त्याच शेतात लावलेल्या संत्र्याच्या झाडांची नोंद सातबारावर करण्याची विनंती केली होती. मात्र, तलाठ्याने त्याला हे सर्व करण्यासाठी थेट 2 हजाराच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने थेट लाचलुचपत कार्यालय गाठून, तलाठ्याविरुद्ध तक्रार केली. 24 जुलैला लाचलुचपत विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. यात तलाठ्याने लाच मगितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आज वसमत रोडवरील 33 केव्ही केंद्राजवळ तक्रारदाराकडून 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
वास्तविक पाहता लाचखोर तलाठी धाडवे याच्याकडे कुरुंदवादी येथील चार्ज आहे. मात्र, 24 जुलैला गिरगाव येथील तलाठी सज्जाचा चार्ज त्यांना देण्यात आला होता. पदभार स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने, जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगते आहे.
शेतकरी अस्मानी तसेच सुलतानी संकटाला तोंड देत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत शासकीय कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची अपेक्षा असताना देखील, आशा प्रकारे लाचेची मागणी केली जात असे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागत असल्याचे चित्र आहे. मात्र, दुसऱ्या सज्जाचा चार्ज स्वीकारताच तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने याची चविष्ट चर्चा परिसरात होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय लाटकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिमन्यू कांदे यांनी केली.