हिंगोली Organ Sale by Farmers : खरीप हंगामात यंदा अनियमित पावसामुळं शेतात पिक आलं नाही. तसंच हाती आलेल्या शेतमालाला भावही मिळत नाही. पीकविमा किंवा कुठलं शासकीय अनुदानही मिळालेलं नाही. या अनेक संकटांमुळं हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडल्याचं चित्र दिसतंय. यामुळं कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासह सात-बारा उताऱ्यावर असलेलं बँकेचं कर्ज फेडायचं कसं, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. याला कंटाळून हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी चक्क आपले अवयव विक्रीला काढले आहे.
शेतकऱ्यांनी अवयव विक्री काढण्यात येणार असल्याचं पत्र तहसीलदारांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं. विशेष म्हणजे या पत्रासोबत शेतकऱ्यांनी अवयवांचे रेट कार्डही पाठवले होते. या निवेदनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली नाही तर थेट मुंबई गाठून रस्त्यावर आमची किडनी, लिव्हर, डोळे आदी विविध अवयव विकणार आहोत. त्यातून मिळालेल्या पैशातून आम्ही बँकेचं कर्ज फेडू, असा निर्वाणीचा इशारा या शेतकऱ्यांनी सरकारला दिलाय.
शेतकऱ्यांनी पत्रात काय लिहिलं : हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या पत्रात चक्क आपल्या अवयवांचे रेट कार्डही पाठवले आहे. यात शेतकऱ्यांनी किडनी 75 हजार रुपये, लिव्हर 90 हजार रुपये, डोळे 25 हजार रुपये असा दर शेतकऱ्यांनी ठरवून दिलाय. शेतकऱ्यांनी केलेल्या या मागणीमुळं राज्यात एकच खळबळ उडालीय. शेतकऱ्यांनी अशा मागणींचं निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं. यावरुन आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. पण, सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
लाखभर रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ येते. हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
शेतकऱ्यांची उद्विग्न प्रतिक्रीया : पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागतंय. शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल सरकार याबाबत गंभीर नाही. बँक कर्जापोटी मरणाची वेळ आली असताना आत्महत्या करुन बदनामीचं मरण पत्करण्यापेक्षा अवयव विक्रीतून कर्जाची परतफेड करुन मरण पत्करु, अशी उद्विग्न प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिलीय.
हेही वाचा :
- ऊस दरासाठी आंदोलन पेटलं; कोल्हापूरसह राज्यात चक्काजाम आंदोलन, सरकारला दिली डेडलाईन
- Agitation For Sugarcane Rate : कोल्हापुरात ऊस दर आंदोलन पेटलं, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना लावल्या आगी
- Ravikant Tupkar Diwali Celebration: शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी शेतात सोयाबीन, कापूस पूजन करुन केली दिवाळी साजरी