हिंगोली - दारूच्या नशेत वडील आईला मारत असल्याचे पाहून मुलगी त्यांचे भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेली. त्यावेळी रागाच्या भरात वडिलांनी तिच्याच डोक्यात लोखंडी रॉड मारला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात घेऊन जाताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. वैष्णवी विनोद भालेराव (वय 7) असे मृत मुलीचे नाव आहे.
मंगळवारी रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. तर सवना येथे दारुडा विनोद हा मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत आपली पत्नी रत्नमाला सोबत भांडण करीत होता. घरात आरडा-ओरड सुरू असताना वैष्णवी आई-वडिलांचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये धावली, तोच रागाच्या भरात विनोदने हातातील लोखंडी रॉड वैष्णवीच्या डोक्यात घातला. यात वैष्णवी जागीच कोसळली. जखमी अवस्थेत असलेल्या आई रत्नमाला यांना काहीच सुचेना. नातेवाईकांनी वैष्णवीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करूम मयत घोषित केले.
हेही वाचा - मित्राकडे रंगपंचमी खेळण्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा तळ्यात बुडून मृत्यू
रत्नमाला यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. घटना घडताच विनोद हा घटनास्थळावरून फरार झाला होता. घटनेची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस जमादार साहेबराव राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. पंचनामा केला आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
पती-पत्नीच्या भांडणात निष्पाप मुलीचा बळी गेल्याने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. सवना येथे गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होते. याकडे पोलिसांचे मात्र साफ दुर्लक्ष असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
हेही वाचा - कोरोना विषाणूच्या धसक्याने हिंगोलीत कोरडी रंगपंचमी साजरी